Mufasa The lion king trailer : बहुप्रतीक्षित ‘मुफासा : द लायन किंग’चा दुसरा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, रिलीजपूर्वी चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एक मिनीट ५६ सेकंदांच्या या ट्रेलरने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. डोळे दीपवणाऱ्या अप्रतिम दृश्यांसह आणि उत्कंठावर्धक कथानकाने या चित्रपटाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. बार्री जेनकिन्स दिग्दर्शित या चित्रपटात हिंदी डब्ड व्हर्जनसाठी मोठ्या कलाकारांचा सहभाग असल्याने भारतीय चाहत्यांमध्ये विशेष उत्साह आहे.

शाहरुख खान, आर्यन आणि अबरामचा आवाज ‘मुफासा’ला

‘मुफासा : द लायन किंग’च्या हिंदी डब्ड व्हर्जनमध्ये शाहरुख खान, त्याचा मोठा मुलगा आर्यन खान व लहान मुलगा अबराम यांनी आवाज दिला आहे. शाहरुख खान (Shah Rukh Khan) ‘मुफासा’, आर्यन (Aryan Khan) ‘सिंबा’, तर अबराम (Abram Khan) ‘लहान मुफासा’ला आवाज देणार आहेत. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द लायन किंग’ या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर ‘मुफासा : द लायन किंग’ हा चित्रपटाचा पुढील भाग येणार आहे.

हेही वाचा…शाहरुख फक्त ‘या’ एकाच ठिकाणी रडतो; स्वत: केला खुलासा, म्हणाला, “जेव्हा तुम्ही अपयशी होता…”

मुफासा आणि टाकाची अनोखी दोस्ती

नवीन ट्रेलरमध्ये मुफासा आणि टाका यांच्यातील सुरुवातीच्या मैत्रीची झलक दिसून येते. मुफासा एक अनाथ सिंह आहे; तर टाका सत्ताधारी राजा असलेल्या सिंहाचा वारसदार आहे. सुरुवातीला टाकाच्या वडिलांनी ही मैत्री नाकारली असली तरी पुढे ही दोस्ती घट्ट होत जाते. दोघे मिळून अनेक अडचणींना सामोरे जातात आणि एकमेकांसाठी लढतात. या प्रवासामध्ये त्यांचे बंध दृढ होत जातात. ट्रेलरमध्ये त्यांच्या संघर्षाचा आणि पुढे आयुष्यभर टिकणाऱ्या नात्याचा प्रवास प्रभावीपणे दाखवला आहे.

तेलुगूमध्ये महेश बाबू, तर तमीळमध्ये अर्जुन दासचा आवाज

या चित्रपटाच्या तेलुगू डब्ड व्हर्जनमध्ये महेश बाबू ‘मुफासा’ला आवाज देणार आहे आणिि त्यामुळे तेलुगू चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. त्याचप्रमाणे तमीळ व्हर्जनसाठी अभिनेता अर्जुन दास ‘मुफासा’ला आवाज देणार आहे.

हेही वाचा…२०२५ साठी शाहरुख खानची मोठी घोषणा! आर्यन करणार ‘या’ क्षेत्रात पदार्पण, तर पत्नी गौरी…; पोस्ट शेअर करत म्हणाला…

मुलांबरोबर काम करण्याचा शाहरुखचा अनुभव

शाहरुख खानने यापूर्वी या चित्रपटाविषयी आपला उत्साह व्यक्त केला होता. त्याने सांगितले, “मुफासाच्या बालपणापासून ते महान राजा होईपर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवला आहे. हा अविस्मरणीय अनुभव होता. विशेष म्हणजे या प्रकल्पात माझ्या मुलांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आर्यन आणि अबरामबरोबर काम करणे माझ्यासाठी खूप खास आहे.”

‘मुफासा : द लायन किंग’ या वर्षाच्या अखेरीस २० डिसेंबर २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, त्यासाठी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.