शाहरुख खान आणि आमिर खान यांना अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात एकत्र नाचताना पाहून चाहते खूश झाले होते. मात्र, एक काळ असा होता जेव्हा हे दोन सुपरस्टार त्यांचातील मतभेदामुळे एका व्यासपीठावर एकत्र येत नसत. अलीकडेच सोशल मीडियावर यांच्यातील जुन्या मतभेदांची एक क्लिप व्हायरल झाली, ज्यात दोघेही एकमेकांना टोमणे मारताना दिसत आहेत.

शाहरुख खान आपला चित्रपट ‘माय नेम इज खान’ प्रमोट करीत होता आणि आमिर खान ‘३ इडियट्स’साठी देशभर फिरत होता. दोन्ही चित्रपट दोन महिन्यांच्या अंतराने रिलीज झाले होते. त्यावेळी आमिरने एक अनोखी प्रमोशनल स्ट्रॅटेजी वापरली होती. तो वेगवेगळ्या वेशांत देशभर फिरत होता आणि सामान्य लोकांशी संवाद साधत होता. अनेकांनी या प्रमोशनल ट्रिकचं खूप कौतुक केलं. मात्र, शाहरुखनं आमिरच्या या प्रमोशन पद्धतीला छिछोरापन (बालिशपणा), असं म्हटलं होतं. तेव्हाचाच व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे; ज्यात आमिर शाहरुखला प्रत्युत्तर देताना दिसत आहे.

हेही वाचा…हृतिक रोशन-सबा आझादच्या नात्याला ३ वर्षे पूर्ण, अभिनेत्याच्या ‘त्या’ पोस्टवर पूर्वाश्रमीची पत्नी कमेंट करत म्हणाली…

काय म्हणाला होता शाहरुख?

‘माय नेम इज खान’च्या प्रमोशनदरम्यान झालेल्या एका पत्रकार परिषदेत शाहरुख खानला आमिरच्या प्रमोशनल पद्धतीबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर शाहरुख म्हणाला, “माफ करा, मी हा शब्द वापरतोय; पण मला असं वाटतं की, हा एक प्रकारच्या बालिशपणाचा नमुना आहे. आमच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आम्ही कधीही असं काही करणार नाही. प्रत्येक चित्रपटाची स्वतःची अशी प्रमोशन पद्धत असते आणि आमच्या चित्रपटाचीही वेगळी व अनोखी अशी स्ट्रॅटेजी असेल.”

आमिरने केला होता पलटवार

शाहरुखच्या या वक्तव्यानंतर एका मुलाखतीत जेव्हा आमिरला त्याबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्यानं उत्तर दिलं, “जिथपर्यंत ‘बालिशपणा’चा प्रश्न आहे, ते शाहरुखला जास्त चांगलं माहीत असावं. कारण- त्यानं स्वतःच्या आयुष्यात बराच बालिशपणा केलेला आहे. तो या सगळ्यात एक्स्पर्ट आहे.”

हेही वाचा…“मानवत मर्डर्सची कथा माझ्या गावाजवळच घडली”; बालपणीच्या भीतीदायक आठवणी सांगत मकरंद अनासपुरे म्हणाले, “आमच्या दैनंदिन जीवनावर… “

‘माय नेम इज खान’ व ‘३ इडियट्स’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप हिट ठरले. मात्र, ‘३ इडियट्स’ शाहरुखच्या चित्रपटाला मागे टाकत त्या वर्षाचा सर्वाधिक कमाई करणारा बॉलीवूड सिनेमा ठरला. या चित्रपटानं केवळ भारतातच नव्हे, तर चीन व जपानसारख्या देशांमध्येही मोठं यश मिळवलं. ‘३ इडियट्स’नं २०१३ पर्यंत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट म्हणून आपला विक्रम कायम ठेवला होता.