चित्रपट निर्माता रोहित शेट्टी आणि अभिनेता शाहरुख खान यांनी ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘दिलवाले’ या चित्रपटांसाठी एकत्रित काम केले. परंतु, त्यानंतर त्यांनी एकही चित्रपट एकत्र केलेला नाही. कालांतराने दोघांमध्ये कथित भांडण झाल्याच्या अफवा पसरल्या. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यांच्यात झालेल्या वादाबद्दल प्रश्न विचारला असता, दिग्दर्शक रोहित शेट्टी याने या समस्येकडे लक्ष देत आपले मत व्यक्त केले.
कथित भांडणाबद्दल रोहित शेट्टीने केला खुलासा
‘गोलमाल’ या चित्रपटाची सीरिज आणि ‘सिंघम’सारख्या चित्रपटांमधील कामासाठी ओळखला जाणारा ‘इंडियन पोलीस फोर्स’चा निर्माता रोहित शेट्टी याने अलीकडेच बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानबरोबरच्या त्याच्या व्यावसायिक संबंधांबद्दल खुलासा केला. द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत, रोहित शेट्टीने शाहरुखसोबतच्या भांडणाच्या अफवा फेटाळून लावल्या.
पुढे रोहित शेट्टी म्हणाला, “असं काहीच नाही, एकत्र चित्रपट करायचा असेल तर तो चेन्नई एक्स्प्रेसपेक्षा उत्तम असायला हवा, त्याची कथा चांगली असायला हवी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर कधी चित्रपटासाठी कोणता विषय आला तर मी शाहरुखबरोबर जरूर काम करेन.”
हेही वाचा… मुलीच्या लग्नानंतर आमिर खान दुसऱ्या पत्नीबरोबर रोड ट्रीपवर; किरण रावने शेअर केलेले फोटो चर्चेत
२०१३ मध्ये दिग्दर्शित केलेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटात किंग खान हा मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि सत्यराज यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. त्यांनी ‘दिलवाले’या चित्रपटासाठीही एकत्र काम केलं, ज्यामध्ये शाहरुख, काजोल, वरुण धवन, क्रिती सेनॉन, पंकज त्रिपाठी असे दिग्गज कलाकार आणि इतर कलाकार होते.
रोहित शेट्टीच्या कामाबाबत सांगायचं झाल्यास ‘इंडियन पोलीस फोर्स’ या ॲक्शन आणि थ्रिलर वेब सीरिजद्वारे रोहित शेट्टीने ओटीटीवर पदार्पण केलं आहे. यात सिद्धार्थ मल्होत्रा हा पोलिसाच्या भूमिकेत आहे. शिल्पा शेट्टी कुंद्रा, विवेक ओबेरॉय, श्वेता तिवारी, निकितीन धीर, ऋतुराज सिंग, मुकेश ऋषी, ललित परिमू यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
रोहित शेट्टी निर्मित आणि रोहित शेट्टी आणि सुशवंत प्रकाश दिग्दर्शित, ही सात भागांची अॅक्शन-पॅक मालिका देशभरातील भारतीय पोलिस अधिकार्यांना श्रद्धांजली आहे. रोहित सध्या ‘सिंघम अगेन’साठी शूटिंग करत आहे, ज्यामध्ये दीपिका पदुकोण आणि टायगर श्रॉफ पोलिसांच्या विश्वात पदार्पण करत आहेत.