Rakesh Roshan documentary: दिग्दर्शक राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केलेला ‘करण अर्जुन’ १९९५ साली प्रदर्शित झाला होता. ‘करण अर्जुन’ हा बॉलीवूडमधील आयकॉनिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. तिकीटबारीवर हिट ठरलेल्या या चित्रपटाची निर्मिती मात्र सोपी नव्हती. राकेश रोशन यांनी नेटफ्लिक्सवरील “द रोशन्स” या माहितीपटात चित्रपटाच्या निर्मितीमध्ये आलेल्या आव्हानांची माहिती दिली. शाहरुख आणि सलमान हे अर्ध्यातूनच चित्रपटाला राम राम ठोकणार होते, अशी आठवण त्यांनी सांगितली.
“शाहरुख खानचा पुर्नजन्माच्या कथेवर विश्वास नव्हता. तर सलमान खान म्हणाला की, तुम्ही मोठा चित्रपट करणार असल्याचे सांगून आम्हाला राजस्थानच्या या गावात घेऊन आलात. मी तर वेगळीच कल्पना केली होती”, असे राकेश रोशन यांनी सांगितले. सलमान खानची समूजत घालताना ते म्हणाले, सलमान तू अभिनेता आहेस. दिग्दर्शकाने कुठे चित्रपट तयार करावा, याची कल्पना तू करू नकोस. राकेश रोशन पुढे म्हणाले, त्या दोघांचाही चित्रपटातला रस कमी होत होता. जेव्हा चित्रीकरणासाठी सर्व सज्ज असायचे, चांगला प्रकाश असायचा तेव्हा बोलावूनही ते यायचे नाहीत. मग ऐनवेळी ते आल्यानंतर चित्रीकरणासाठी सर्वांचीच धावपळ व्हायची.
राकेश रोशन यांच्या दाव्याला अभिनेते आणि विद्यमान खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही दुजोरा दिला. ते म्हणाले, त्या दोघांनी (शाहरुख आणि सलमान) राकेश रोशन यांना चांगलाच त्रास दिला होता. ते बिलकूल सहकार्य करत नव्हते.
या माहितीपटात शाहरुख खाननेही राकेश रोशन यांच्याबरोबर काम करतानाचे अनुभव कथन केले आहेत. त्यानेही आपण त्रास दिल्याचे मान्य केले. तो म्हणाला, हो, आम्ही दोघेही खोडकर असल्यामुळे त्यांना बराच त्रास सहन करावा लागला. राकेश रोशन यांच्या पत्नी पिंकी रोशन यांनी आम्हाला अनेकवेळा फटकारल्याचीही आठवण शाहरुखने सांगितली. पिंकीजी म्हणायच्या, तू गुड्डूला (राकेश रोशन) खूप त्रास देतोयस, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.
शाहरुख पुढे म्हणाला की, पिंकीजी माझ्यावर रागवण्याचे कारणही तसेच होते. सलमानच्या तुलनेत मी जरा बरा होतो. काही गडबड झाली की, मी सलमानवर ढकलून द्यायचो. आम्ही लहान मुलासारखे वागत होतो. खरे सांगायचे तर आम्ही राकेश रोशन यांना त्यावेळी बरेच छळले.
राकेश रोशन पुढे म्हणाले की, मी जेव्हा जेव्हा काही नवीन सांगायचो, तेव्हा तेव्हा ते दोघे भलताच मुद्दा सांगायचे. मी म्हणायचो, नाही मला हे असेच हवे आहे आणि ते करण्यासाठी त्यांची नकारघंटा असायची. ही सगळी आव्हाने असतानाही चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आणि चित्रपट हिट ठरला. शाहरुख आणि सलमानलाही चित्रपट हिट झाल्यानंतर आश्च्रर्य वाटले.
आणि शाहरुखने राकेश रोशन यांचे पाय धरले
शाहरुख खान म्हणाला की, चित्रपट पाहताना प्रेक्षक चेकाळत होते, ते शिट्या-टाळ्या वाजवत होते. मला प्रश्न पडायचा की, यांना यात काय आवडले? हे का आनंद व्यक्त करतायत? त्यानंतर मला आठवतंय मी राकेश रोशन यांच्या पाया पडलो होतो. त्यांना म्हणालो, माफ करा. मला चित्रपट समजला नाही. हा माझ्यासाठी अगदी वेगळा अनुभव होता. कधी कधी मी साकारत असलेल्या पात्रावर माझा विश्वास नसतो. पण प्रेक्षकांचा मात्र त्या पात्रावर जीव असतो. मला आनंद वाटतो की, राकेश रोशन यांच्यामुळे मला ही संधी मिळाली.