बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. त्यानंतर शाहरुखचा बहुप्रतीक्षित ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलून ती २ जून २०२३ ऐवजी ७ सप्टेंबर २०२३ अशी करण्यात आली. त्यामुळे आता शाहरुखचे चाहते या चित्रपटाची आतुरतेनं वाटत पाहत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार असल्याचं समोर आलं आहे. याबाबत शाहरुखनं स्वतः माहिती दिली आहे.
शाहरुख खाननं सोशल मीडियावर एक मोशन व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामध्ये ‘जवान’ चित्रपटाच्या ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख दाखवण्यात आली आहे. १० जुलैला १०.३० वाजता ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. शाहरुखनं हा मोशन व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, ‘मैं पुण्य हूँ या पाप हूँ?… मैं भी आप हूँ…’ शाहरुखचा हा चित्रपट ७ जुलै २०२३ ला हिंदी, तमीळ, तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा – इंडस्ट्रीमध्ये कोणत्या अभिनेत्याच्या घरचं जेवण सर्वात जास्त आवडतं?, महेश मांजरेकर म्हणाले…
‘जवान’मध्ये शाहरुखव्यतिरिक्त दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, सुनील ग्रोवर व योगी बाबू महत्त्वाच्या व्यक्तिरेखांत दिसणार आहेत. तसेच दीपिका पदुकोण पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वतः शाहरुख खान आणि पत्नी गौरी खाननं केली आहे.
शाहरुखच्या ‘जवान’नंतर त्याचा ‘डंकी’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाची शूटिंग सध्या काश्मीरमध्ये सुरू आहे. राजकुमार हिरानी ‘डंकी’ चित्रपटाचं दिग्दर्शन करीत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच राजकुमार हिरानी आणि शाहरुख खान एकत्र काम करत आहेत.
हेही वाचा – Video “सगळे एका माळेचे मणी…”; सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मराठमोळ्या अभिनेत्रीचं परखड मत
दरम्यान, शाहरुखच्या ‘जवान’ व ‘डंकी’ या चित्रपटांचे ओटीटी अधिकार खूप मोठ्या किमतीला विकले गेले आहेत. दोन्ही चित्रपटांचे ओटीटी अधिकार एकूण ४८० कोटी रुपयांना विकले गेल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी ‘जवान’ २५० कोटीला; तर ‘डंकी’ २३० कोटीला विकला गेला.