२०२० हा काळ किती भयावह होता हे सर्वज्ञात आहे. कोरोना महामारीने संपूर्ण जगभरात थैमान घातलं होतं. यामुळे करोडो लोकांचे जीव गेले. या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस या कोरोना योद्ध्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून रात्रंदिवस काम केलं. यादरम्यान मसीहा म्हणून अनेकजण लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. यामध्ये एक होती अभिनेत्री शिखा मल्होत्रा. या अभिनेत्रीने आपल्या जीवाची परवा न करता महापालिकेच्या रुग्णालयात नर्स म्हणून कोरोनाबाधितांची सेवा केली. पण, त्यानंतर तिच्याबरोबर असं काही घडलं, ज्याची तिनेही कल्पना केली नव्हती. पण, माणसाच्या अंगी जिद्द असेल तर तो कोणत्याही मोठ्या संकटावर मात करू शकतो; तसंच काहीसं अभिनेत्री शिखा मल्होत्रानं करून दाखवलं आहे आणि ती पुन्हा एकदा झगमगत्या दुनियेत परतण्यासाठी सज्ज झाली आहे. पण, शिखाबरोबर नेमकं काय घडलं, जाणून घ्या.
बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या ‘फॅन’ या चित्रपटात शिखा मल्होत्रानं एक छोटीशी भूमिका निभावली होती. त्यानंतर २०२० मध्ये ‘कांचली’ चित्रपटातून मुख्य भूमिका साकारून तिनं बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं. पण, यादरम्यान भारतात कोरोना विषाणूनं प्रवेश करत आपलं भयावह रूप सर्वत्र पसरवण्यास सुरुवात केली होती. त्यात लाखो लोकांचा मृत्यू होत होता. लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. अशातच अभिनेत्री शिखाने लोकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा – सहकुटुंब सहपरिवार मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, शूटींगचा शेवटचा व्हिडीओ समोर
मनोरंजनविश्वात येण्यापूर्वी शिखाने नर्सिंगचे शिक्षण घेतलं होतं. त्यामुळे तिनं मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात नर्स म्हणून काम करायला सुरुवात केली. एक वर्ष तिनं लोकांची सेवा केली. पण, यानंतर ती स्वतः कोरोनाची शिकार झाली. त्यावेळीही ती डगमगली नाही. तिनं कोरोनावरही मात केली. पण, संकटातून बाहेर पडताच तिला ब्रेनस्ट्रोक झाला. शिखाच्या शरीराच्या उजव्या बाजूला अर्धांगवायू झाला. औषधांमुळे तिचं सतत वजन वाढत होतं, शरीराला सूज येत होती.
हेही वाचा – “हॉलीवूड अमूक, हॉलीवूड तमूक…”, शाहीद कपूरच्या पत्नीचे ‘बार्बी’ चित्रपटाबद्दल वक्तव्य; म्हणाली…
हेही वाचा – Oppenheimer: सिद्धार्थ मल्होत्राने पत्नी कियाराबरोबर पाहिला ‘ओपनहायमर’ चित्रपट अन् दिग्दर्शकाविषयी म्हणाला…
एकाच वेळी आलेल्या संकटामुळे कोणताही वाईट विचार न करताना शिखानं त्याचा सामना केला. वजन वाढल्यामुळे अभिनेत्रीचं ग्लॅमरस रुप नाहीसं झालं होतं. परंतु, तिनं हार मानली नाही. २०२१-२२ या दोन वर्षांत शिखानं आलेल्या संकटावर मात केली. सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’नं शिखाचे रिकव्हरी होण्यापूर्वीचे आणि रिकव्हरी झाल्यानंतरचे फोटो शेअर केले आहेत; जे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.