अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर २१ मे रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात क्वालिफायर सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात शाहरुख खानच्या केकेआर संघाने बाजी मारली. यानंतर अभिनेत्याने संपूर्ण संघाबरोबर जोरदार सेलिब्रेशन केलं. सामना संपल्यानंतर, शाहरुख रात्री उशिरा टीमसह अहमदाबादमधील ITC नर्मदा हॉटेलमध्ये पोहोचला, जिथे या सगळ्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. परंतु, बुधवारी सकाळी अभिनेत्याची प्रकृती बिघडली.
उष्माघाताच्या त्रासामुळे शाहरुखवर सुरुवातीला प्राथमिक उपचार करण्यात आले. तरीही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने अखेर किंग खानला अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यावर अभिनेत्याची पत्नी गौरी खान, मॅनेजर पूजा ददलानी, अभिनेत्री व केकेआर संघाची सहमालक जुही चावला आणि तिचे पती असे सगळेजण शाहरुखची भेट घेण्यासाठी पोहोचले होते.
हेही वाचा : गुलाबी टी-शर्टवर लाडक्या लेकीचं नाव! रणबीर कपूरचा फोटो पाहिलात का? सर्वत्र होतंय कौतुक
शाहरुखच्या प्रकृतीबद्दल गेल्या दोन दिवसांपासून त्याचे लाखो चाहते चिंता व्यक्त करत होते. अखेर किंग खानची मॅनेजर पूजा ददलानीने एक्स पोस्ट शेअर करत त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा झाल्याचं सांगितलं होतं. यानंतर शाहरुखला काही वेळातच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
हेही वाचा : ‘बिग बॉस ओटीटी’मधून सलमान खानचा पत्ता कट? होस्ट म्हणून ‘या’ अभिनेत्याच्या नावाची चर्चा, पाहा प्रोमो
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळावल्यावर शाहरुख खानने अहमदाबादहून चार्टर्ड विमानाने रातोरात मुंबई गाठली. यावेळी त्याच्याबरोबर पत्नी गौरी खान व त्याची मॅनेजर पूजा उपस्थित होती. अभिनेता मुंबईत आल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. परंतु, यामध्ये त्याच्या टीमने शाहरुख गाडीत बसत असताना छत्री धरल्याने त्याची झलक स्पष्टपणे दिसली नाही. केवळ गौरी आणि पूजा गाडीत बसल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
शाहरुख मुंबईत परतल्याने तो रविवारी होणाऱ्या आयपीएलच्या अंतिम सामन्याला उपस्थिती लावणार की नाही याकडे त्याच्या तमाम चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. बुधवारी जुही चावलाने ‘न्यूज १८’ शी संवाद साधताना शाहरुख अंतिम सामन्याला नक्की येईल असा विश्वास व्यक्त केला होता. याशिवाय त्याची प्रकृती सुधारली असल्याचं देखील अभिनेत्रीने यावेळी सांगितलं होतं.