Shah Rukh Khan Video Viral: आपल्या आवडत्या कलाकारांना भेटणे हे चाहत्यांचे स्वप्न असते. त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घराबाहेर, एखाद्या कार्यक्रमात चाहते गर्दी करताना दिसतात. अनेक चाहते आपल्या आवडत्या कलाकारांना भेटल्यानंतर भावूकदेखील होताना दिसतात. आता शाहरुख खानच्या बाबतीतदेखील अशीच एक घटना घडली आहे.

शाहरुख खान जर्मनीला गेला आहे. जर्मनीतील एका हॉटेलमध्ये अभिनेता थांबला आहे, ही माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि शाहरुखच्या चाहत्यांनी हॉटेलबाहेर मोठी गर्दी केली. शाहरुखनेदेखील त्याच्या चाहत्यांना निराश केले नाही. त्याने त्यांच्याबरोबर फोटो काढले. त्यांच्याशी तो प्रेमाने वागला. काहींना त्याने ऑटोग्राफदेखील दिले. त्यानंतर अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावरदेखील शाहरुखच्या भेटीचा उल्लेख करत पोस्ट शेअर केल्या.

शाहरुख खानला भेटल्यानंतर चाहतीला अश्रू अनावर

शाहरुख खानचे जर्मनीतील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका फोटोमध्ये शाहरुख एका चाहत्याच्या डायरीमध्ये सही करताना दिसत आहे, तर दुसऱ्या एका फोटोमध्ये शाहरुख त्याच्या चाहत्याच्या टी-शर्टवर सही करताना दिसत आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये शाहरुख त्याच्या चाहत्यांना अगदी प्रेमाने भेटताना दिसत आहे.

या सगळ्यात एका व्हिडीओने चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. शाहरुखच्या एका चाहतीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केल आहे. या व्हिडीओमध्ये चाहतीने शाहरुखला भेटल्यानंतर तिला काय अनुभव आला हे सांगितले आहे. शाहरुखला पाहिल्यानंतर ही महिला चाहती रडताना दिसत आहे. शाहरुखने तिच्याशी संवाद साधला, तिला मिठीही मारली. तसेच तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला. यादरम्यान चाहतीला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. तिने शाहरुखला भेटल्यानंतर तिच्या भावना व्यक्त केल्या. तिने असाही खुलासा केला की, शाहरुखने तिला व तिच्या मित्रांना फोटो न काढण्याची विनंती केली.

आता शाहरुख जर्मनीला का गेला आहे, याचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, सोशल मीडियावरील या व्हिडीओंनी चाहत्यांचे मन जिंकले आहे. जगभरात शाहरुखचे कोट्यवधी चाहते आहेत. शाहरुखदेखील त्याच्या वागणुकीतून सर्वांचे मन जिंकताना दिसतो.

दरम्यान, शाहरुख खान ‘मेट गाला २०२५’मध्ये सहभागी होणार आहे. मेट गाला रेड कार्पेटवर जाणारा शाहरुख खान पहिला भारतीय अभिनेता ठरणार आहे. कामाच्या बाबतीत बोलायचे तर तो लवकरच ‘द किंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.