Shah Rukh Khan Birthday Special: अभिनेता शाहरुख खानचा आज वाढदिवस आहे. रात्री उशिरा शाहरुखने मन्नच्या बाहेर येऊन त्याच्या चाहत्यांना अभिवादन केलं. शाहरुख खानचं आयुष्य आणि त्याचा ‘किंग खान’ किंवा बॉलिवूडचा ‘रोमान्स किंग’ होण्यापर्यंतचा प्रवास बराच मोठा आहे. त्याचा प्रचंड उत्साह, त्याची प्रचंड मेहनत असं सगळं त्यामागे आहे. मात्र अशात त्याच्या एका जुन्या मुलाखतीतलं त्याचं वाक्य चांगलंच चर्चेत आलं आहे. त्याला विचारण्यात आलं होतं की तुझ्या बरोबर कुठल्याही अभिनेत्रीचं नाव का जोडलं जात नाही? त्या प्रश्नावर कसलाच विचार न करता शाहरुखने एक उत्तर दिलं होतं. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

नेमका काय आहे हा किस्सा?

शाहरुख खान ‘डुप्लिकेट’ च्या सेटवर असताना त्याची मुलाखत घेण्यात आली होती. त्यावेळी त्याला विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यातला एक प्रश्न होता, तुझ्याबरोबर अद्याप एकाही अभिनेत्रीचं नाव का जोडलं गेलं नाही? तुझ्याबद्दल कुठलंही गॉसिप ऐकू आलं नाही. त्यावर शाहरुख चटकन म्हणाला, “मला ठाऊक नाही. कदाचित मी Gay (समलिंगी) आहे. कारण माझ्याबद्दल अशीच चर्चा लोक करतात. माझं नाव कुणाबरोबर का जोडलं गेलं नाही मला माहीत नाही. कारण त्या सगळ्याच माझ्या मैत्रिणी आहेत. मी त्यांच्यासह काम करतो. मी माझ्या पत्नीसह खूप सुखी आहे. मी ज्यांच्या बरोबर काम करतो त्यांच्याविषयी माझ्या मनात आपुलकी आहे, प्रेम आहे. मी त्यांच्यासह माझा चांगला वेळ घालवला आहे. सिनेमा तयार करताना आमची मैत्री झाली आहे. अनेक जणी माझ्या घरी येतात, मी त्यांच्या घरी जातो. आमच्यात चांगलं मैत्रीचं नातं तयार झालं आहे. त्यामुळे कदाचित माझं नाव कुणाही बरोबर जोडलं गेलं नसावं. आम्ही एकमेकांना व्यावसायिकदृष्ट्याही समजून घेतो. तसंच भावनिक दृष्ट्याही समजून घेतो. मला कधी असं वाटलं नाही की मी ज्यांच्याबरोबर काम करतो त्यांच्या बरोबर खरोखरचा रोमान्स किंवा प्रेम केला पाहिजे असं मला कधीही वाटलं नाही.” तवलीन सिंग यांनी शाहरुखची एक मुलाखत काही वर्षांपूर्वी घेतली होती. त्या मुलाखतीत त्यांनी शाहरुखला जो प्रश्न विचारला त्यात शाहरुखने हे उत्तर दिलं होतं.

पाहा व्हिडीओ

आजच आला डंकीचा टिझर

अभिनेता शाहरुख खान हा ५८ वर्षांचा झाला आहे. या वर्षीच त्याने ‘पठाण’ आणि ‘जवान’ असे दोन चित्रपट दिले आहेत. दिवाना या सिनेमापासून सुरु झालेली त्याची यशस्वी घोडदौड ही अद्यापही सुरु आहे. तसंच आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘डंकी’ या त्याच्या सिनेमाचा टिझरही प्रकाशित करण्यात आला आहे. अशात शाहरुखचं हे जुनं वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे. लोक त्यावर विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर देताना दिसत आहेत.

काजोल आणि शाहरुखची सुपरहिट जोडी

शाहरुख खान हा ‘रोमान्सचा किंग’ म्हणून ओळखला जातो. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘दिलवाले’, ‘कुछ कुछ होता है’, ‘दिल तो पागल है’, ‘ओम शांती ओम’ यासह अनेक चित्रपटांमधून शाहरुख खान हा पडद्यावर रोमान्स करताना दिसला आहे. रोमँटिक हिरोची त्याची इमेज बदलण्याचा प्रयत्न त्याने ‘पठाण’ मधून केला होता. त्या सिनेमालाही चांगलं यश मिळालं. काजोल आणि शाहरुखची जोडी ही आजवरच्या सुपरहिट जोड्यांपैकी एक मानली जाते.

Story img Loader