बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान उत्तम अभिनेता तर आहेच पण आयपीएल सामन्यातील संघ ‘कोलकाता नाइट रायडर्स’चा मालकदेखील आहे. आयपीएलच्या हंगामाला सुरूवात झाल्यापासून संपूर्ण भारतात क्रिकेटमय वातावरण झालं आहे. १४ एप्रिल रोजी रविवारी ‘कोलकाता नाइट रायडर्स’ विरुद्ध ‘लखनऊ सुपर जायंट्स’ यांचा सामना पार पडला. या सामन्यात कोलकाताने लखनऊवर ८ विकेट्सनी विजय मिळवला. या सामन्यानंतर शाहरुखने खेळाडूंची भेट घेतली.
‘कोलकाता नाइट रायडर्स’ संघातील क्रिकेटपटू सुयश शर्मा याच्याशी शाहरुखच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. फॅशन, लूक्समुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या शाहरुखला सुयशच्या हेयरस्टाईलची भुरळ पडली. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.
शाहरुख खान क्रिकेटर सुयशला मैदानात भेटला. त्याने क्रिकेटरची गळाभेट घेतली. तेव्हा शाहरुखने क्रिकेटर सुयशची हेअरस्टाईल बघितली आणि त्याला ती प्रचंड आवडली. त्याने सुयशला विचारलं, “कोणाच्या सांगण्यावरून तू ही हेअरस्टाईल केली आहेस.” यावर सुयश म्हणाला, “मी स्वत:च केली आहे.”
मैदानात गप्पा मारत असतानाच शाहरुखने त्याच्या मॅनेजर पूजा ददलानीला हाक मारली आणि सांगितले, “पूजा मला अशीच हेअरस्टाईल हवी आहे.” यावर आजूबाजूला असलेले सगळे क्रिकेटर हसले.
हेही वाचा… “हा काय वेडा झालाय का?”, ‘त्या’ फोटोमुळे अंकिताचा पती विकी जैन झाला ट्रोल
शाहरुख नेहमीच त्याच्या संघाच्या खेळाडूंशी गप्पा मारताना दिसतो. याआधी किंग खान श्रेयस अय्यर, रिंकू सिंग अशा खेळांडूसह गप्पा मारताना दिसला होता.
दरम्यान शाहरुख खानचा ‘कोलकाता नाइट रायडर्स’ आयपीएलमधील तिसरा सर्वात यशस्वी संघ आहे. माजी कर्णधार गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली ‘कोलकाता नाईट रायडर्स’ने २०१२ मध्ये पहिले विजेतेपद आणि २०१४ मध्ये दुसरे विजेतेपद पटकावले. या सीझनमध्ये आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यांपैकी ४ सामन्यांमध्ये कोलकाताने विजेतेपद पटकावले आहे. कोलकाता संघ सध्या ८ गुणांसह पॉईंट्स टेबलवर दुसऱ्या स्थानावर आहे.