बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) नाव घेतलं की, त्याच्या स्टाईल आणि लक्झरी लाईफमधील अनेक गोष्टी डोळ्यांसमोर येतात. यात त्याचं ‘मन्नत’ही येतंच. शाहरुख खानचा मुंबईतील आलिशान ‘मन्नत’ बंगला (Mannat Bungalow) हा त्याच्या असंख्य चाहत्यांसाठी एखाद्या पर्यटन स्थळापेक्षा काही कमी नाही. शाहरुखचे लाखो चाहते अनेकदा ‘मन्नत’ला भेट देतात आणि घराबाहेर उभे राहून फोटोदेखील काढतात. त्यामुळे आता शाहरुख खान आणि गौरी खान यांनी त्यांचा ‘मन्नत’ (Mannat Bungalow) आणखी सुंदर बनवण्यासाठी नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्याआधीच अभिनेत्याचे घर कायदेशीर अडचणीत अडकले आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी शाहरुखने नूतनीकरण योजनेत उल्लंघन केल्याचा दावा केला आहे. तर नूतनीकरणासाठी कोस्टल रेग्युलेशन झोनकडून मंजुरी घेण्यात आलेली नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
शाहरुख खानकडून नियमांचं उल्लंघन
शाहरुखला (Shah Rukh Khan) त्याच्या बंगल्यात आणखी दोन मजले बांधायचे आहेत अशी बातमी समोर आली होती. ज्यासाठी त्याची पत्नी गौरी खान हिने अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतली होती आणि त्याला मंजुरीदेखील मिळाली होती. अशातच आता संतोष दौंडकर यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याबद्दल याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, शाहरुखकडून घराच्या नूतनीकरणासाठी कोस्टल रेग्युलेशन झोनकडून योग्य परवानगी घेण्यात आलेली नाही.
शाहरुखने नूतनीकरणाची परवानगी घेतली नाही
बार अँड बेंचच्या अहवालानुसार, संतोष दौंडकर म्हणतात की, “शाहरुखचा बंगला मन्नत (Mannat Bungalow) हा ‘ग्रेड-३’ वारसा वास्तूंच्या यादीत समाविष्ट आहे. अशा परिस्थितीत जर शाहरुखने त्याच्या घरात कोणतेही नूतनीकरण केले तर त्याला परवानगी घ्यावी लागेल, जी त्याने घेतलेली नाही”. तसंच शाहरुखवर (Shah Rukh Khan) बारा १ बीएचके फ्लॅट्स एकाच घरात रूपांतरित केल्याचाही आरोप आहे. त्यानंतर आता एनजीटीने संतोष यांना त्यांनी केलेल्या आरोपांबाबत पुरावे सादर करण्यास सांगितले आहे.
संबंधित प्रकरणी २३ एप्रिल रोजी पुढील सुनावणी
या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी होणार आहे. ‘मन्नत’मध्ये (Mannat Bungalow) सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामामुळे, शाहरुखने जॅकी भगनानी आणि त्याच्या वडिलांकडून दोन डुप्लेक्स फ्लॅट भाड्याने घेतले आहेत. नुतनीकरणाचे काम होईपर्यंत शाहरुख आणि त्याचे कुटुंब या भाड्याच्या घरात राहणार आहेत. दरम्यान, आता या संपूर्ण प्रकरणी नक्की काय निकाल लागणार? याकडे शाहरुखच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.