बॉलीवूडचा किंग शाहरुख खानचे अनेक चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर २०२३ मध्ये त्याने ‘पठाण’ आणि ‘जवान’ असे सलग दोन हिट चित्रपट दिले. तब्बल चार वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुखने २०२३ मध्ये बॉलीवूडमध्ये पुनरागमन केले. शाहरुखचे बॉलीवूडमध्ये अनेक सिनेमे फ्लॉप जात होते. मात्र, त्याने सलग हिट चित्रपटांद्वारे चाहत्यांच्या मनावर पुन्हा अधिराज्य गाजवले. अलीकडेच शाहरुख खान दुबईत एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. येथे त्याने आपल्या कारकिर्दीविषयी आणि स्वतःविषयी संवाद साधला.
अपयशाशी कसं जुळवून घ्यायचं?
दुबईतील ‘ग्लोबल फ्रेट समिट’मध्ये, शाहरुख खानला तो अपयशाचा सामना कसा करतो? हा प्रश्न विचारण्यात आला. तसेच तो स्वतःच्या कामाबद्दल किती गंभीर आहे? यावर उत्तर देताना तो म्हणाला, “मला अपयश स्वीकारायला अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी खूप रडतो. मात्र, ते फक्त माझ्या बाथरूममध्ये. हे जग तुमच्या विरोधात नाही, या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवायला हवा. तुमचा चित्रपट चालला नाही, याचं कारण जग तुमच्याविरोधात कट करतंय असं नाही. तुम्ही तो चित्रपट चांगला बनवला नाही, हे तुम्ही स्वीकारायला हवं आणि पुढे जायला हवं.”
लोकांच्या प्रतिक्रिया समजून घ्या
अपयशाच्या वेळी लोकांनी काय विचार करायला हवा, यावरही शाहरुखने मार्गदर्शन केले. तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही अपयशी होता, तेव्हा तुम्हाला हे वाटायला नको की, तुमची सेवा, प्रोडक्ट, नोकरी चुकीची आहे. कदाचित तुम्ही ज्या वातावरणात काम करत होता, तेच नीट समजून घेतलं नसेल. लोक कशा प्रतिक्रिया देत आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. जर मी माझ्या प्रेक्षकांमध्ये भावना जागृत करू शकत नसेल, तर माझं उत्पादन (सिनेमा) कितीही उत्कृष्ट असलं, तरी ते यशस्वी होणार नाही,” असे शाहरुख म्हणाला.
हेही वाचा…Bigg Boss 18 मध्ये सलमान खानने भर मंचावर सुनावलं; आता ‘शार्क टँक’ फेम अशनीर ग्रोव्हर म्हणाला…
जीवनाच्या चढ-उतारांवर शाहरुखने मांडले विचार
‘पठाण’ चित्रपटाच्या सुपरहिट यशानंतर शाहरुखने आयुष्यातील कठीण काळाचा सामना कसा करावा, याबाबतही मते व्यक्त केली. तो म्हणाला, “अपयशाच्या क्षणी निराशा येतेच, पण त्याच वेळी तुमचं अंतर्मन सांगतं, ‘आता यावर खूप विचार झाला, आता उठून पुढे चालू लागा.’ हे तुमचं कर्तव्य आहे, कारण जग तुमच्या विरोधात नाही. तुम्ही हे कधीही मानायला नको की, फक्त तुमच्याच बाबतीत गोष्टी चुकत आहेत. आयुष्य पुढे जात राहतं, तुम्ही त्याला दोष देणं बंद करायला हवं”, असे शाहरुख म्हणाला. शाहरुख खानचे ‘किंग’ आणि ‘पठाण २’ हे आगामी सिनेमे येणार आहेत.