शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होऊन ४० दिवस झाले आहे. या ४० दिवसांत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत नवनवीन विक्रम रचले आहे. ‘पठाण’ चित्रपट प्रेक्षकांना भुरळ पाडण्यात इतका यशस्वी ठरला की तो आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे.
‘पठाण’ने सहाव्या शुक्रवारी ‘बाहुबली २’च्या लाइफटाईम कलेक्शनला मागे टाकलं आहे. ‘पठाण’ आता हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असून सोशल मीडियावर याबद्दल चांगलीच चर्चा होत आहे. एसएस राजामौली यांचा ‘बाहुबली २’ चित्रपट २८ एप्रिल २०१७ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, त्याच्या हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर ५१०.९९ कोटींची कमाई केली होती.
२५ जानेवारी २०२३ रोजी रिलीज झालेल्या ‘पठाण’ने गुरुवारपर्यंत ५१०.६५ कोटींचे कलेक्शन केले होते. ‘बाहुबली २’ ला मागे टाकण्यासाठी चित्रपटाला फक्त ३४ लाख रुपयांची गरज होती. ट्रेड रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, चित्रपटाने शुक्रवारी हा आकडा गाठला आहे आणि यासह ‘पठाण’ अधिकृतपणे सर्वात जास्त कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे.
“पठाण’ने हिंदीमध्ये ‘बाहुबली २’च्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकलंय. हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण…!!! चित्रपटाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा आभार”, असं चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने ट्वीट केलं आहे.
शाहरुख खानच्या या चित्रपटात दीपिका पदुकोण महत्त्वाच्या भूमिकेत आहे, तर जॉन अब्राहम नकारात्मक भूमिकेत आहे. शाहरुख आणि जॉनने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली आहे. चित्रपटाच्या स्टार कास्टमध्ये डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांसारख्या उत्कृष्ट कलाकारांचा समावेश आहे. सलमान खानने या चित्रपटात टायगरच्या रोलमध्ये कॅमिओ केला होत. दरम्यान, ‘पठाण’च्या या यशाचं सोशल मीडियावर सेलिब्रेशन केलं जात आहे.