बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान तब्बल चार वर्षांच्या ब्रेकनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे त्याचे चाहते या चित्रपटासाठी फारच उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातही शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाची क्रेझ आहे. बीड जिल्ह्यातील शाहरुखच्या चाहत्यांनी ‘पठाण’ चित्रपटासाठी तब्बल ४०० स्क्रीनचं बुकिंग केलं आहे. शाहरुखने चाहत्यांसाठी ट्वीटरवर #AskSRK सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये बीडमधील एका चाहत्याने चित्रपटगृहातील ‘पठाण’च्या तिकिटांचा फोटो शेअर केला होता. “बीड युनिव्हर्सने ४००हून अधिक स्क्रीन बुक केल्या आहेत”, असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
हेही वाचा>> शाहरुख खानचा स्त्री वेशातील फोटो शेअर करत नेटकऱ्याने केलं ट्रोल; अभिनेता कमेंट करत म्हणाला…
हेही वाचा>> ‘पठाण’च्या प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच दीपिका पदुकोणचं ‘बेशरम रंग’ गाण्याबाबत वक्तव्य, म्हणाली…
बीडमध्ये ‘पठाण’ चित्रपटाची क्रेझ पाहून शाहरुख खानही भारावला. या चाहत्याच्या ट्वीटला रिप्लाय करत त्याने हटके सल्लाही दिला. “अरे वाह. चित्रपट पाहिल्यानंतर वापरलेल्या तिकिटांची योग्य विल्हेवाट लावा”, असा रिप्लाय शाहरुखने बीडमधील या चाहत्याला केला आहे.
शाहरुख अधूनमधून #AskSRK सेशनद्वारे चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देऊन त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. दरम्यान, शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट ‘बेशरम रंग’ गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. परंतु, त्याचा चित्रपटावर कोणताही परिणाम झाल्याचं दिसत नाही. शाहरुखच्या या ‘पठाण’ चित्रपटाने प्रदर्शनाआधीच अडव्हान्स बुकिंगद्वारे २४ कोटींची कमाई केल्याचं समोर आलं आहे.