शाहरुख खानसाठी २०२३ हे वर्ष खूपच खास ठरलं कारण, यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ या त्याच्या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. गेल्या महिन्यात ७ सप्टेंबरला अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला होता. या चित्रपटात प्रेक्षकांना शाहरुख खान व दाक्षिणात्य सुपरस्टार नयनतारा ही फ्रेश जोडी पाहायला मिळाली. परंतु, यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणने केलेल्या कॅमिओने प्रेक्षकांचं सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं. ‘जवान’मधील कॅमिओसाठी दीपिकाचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात आलं. नुकत्याच दिलेल्या फिल्मफेअरच्या मुलाखतीत अॅटलीने याबद्दल खुलासा केला आहे. दीपिकाला ‘जवान’ चित्रपट कसा व कोणी ऑफर केला याबद्दल देखील अॅटलीने सांगितलं आहे.
हेही वाचा : “आंटीला काम मिळेना…”, ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला अमृता खानविलकरने सुनावलं; म्हणाली, “अहो आजोबा…”
‘जवान’ चित्रपटाचं संपूर्ण श्रेय शाहरुख खानने अॅटली आणि टीमला दिलं आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अॅटलीचा हा पहिलाच बॉलीवूड चित्रपट होता. दीपिकाला चित्रपटातील कॅमिओसाठी कशी विचारणा केली? याबद्दल प्रश्न विचारल्यावर अॅटली म्हणाला, “दीपिकाच्या कॅमिओबद्दल मी सर्वात आधी पूजाला (शाहरुख खानची मॅनेजर) विचारलं होतं. ऐश्वर्याच्या भूमिकेसाठी आपण दीपिकाला विचारुया का? असं विचारताच पूजाने हो चालेल…शाहरुखशी बोलून बघते असं मला कळवलं होतं.”
हेही वाचा : कंगना रणौतच्या ‘तेजस’ची बॉक्स ऑफिसवर निराशाजनक सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी
अॅटली पुढे म्हणाला, “शाहरुख सरांनी तिला याबद्दल आधीच विचारलं होतं आणि ती भूमिका करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं. आपली टीम जाईल…तिला संपूर्ण कथेचं वर्णन करेल तिला स्क्रिप्ट आवडली तर ती नक्कीच करेल असा निरोप शाहरुख सरांनी मला दिला.” यानंतर दीपिका कल्की चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादला आलेली असताना अॅटलीने स्वत: जाऊन तिची भेट घ्यायचं ठरवलं.
हेही वाचा : “समोरचा कितीही माजलेला असला तरी…”, मराठा आरक्षणाबद्दल किरण मानेंची पोस्ट; म्हणाले, “अशा आंदोलनांचा इतिहास…”
“शाहरुख सरांमुळे दीपिका पदुकोणने ‘जवान’साठी लगेच होकार दिला होता. मी तिला म्हणालो, मॅम ही लहान भूमिका अजिबात नाहीये. ही चित्रपटातील सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. मी हैदराबादला भेटून तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. यावर कसलाही विचार न करता दीपिकाने ‘याची गरज नाही…मी खरंच ती भूमिका करेन’ असं उत्तर मला दिलं होतं. पण, तरीही मी तिला संपूर्ण कथेचं थोडक्यात वर्णन करून सांगितलं. यावर ही खूपच भारी भूमिका आहे अशी तिची पहिली प्रतिक्रिया होती. यानंतर गोष्टी जुळून आल्या…पुढे दीपिका आणि आमच्या टीमला एकत्र काम करण्याची संधी मिळाली. डायलॉगपेक्षा तिच्या डोळ्यातचं अभिनयाची ताकद आहे.” असं अॅटलीने अभिनेत्रीचं कौतुक करत सांगितलं.