बॉलीवूडमध्ये शाहरुख आणि गौरी खान यांच्याकडे आदर्श जोडी म्हणून पाहिले जाते. आयुष्यातील कठीण काळात गौरीने कायम मदत केल्याचे शाहरुखने अनेकदा सांगितले आहे. जगभरात ‘इंटिरियर डिझायनर’ म्हणून गौरीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोमवारी मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गौरीच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी शाहरुखने पत्नीचे ‘माय लाइफ माय डिझाइन’ हे पुस्तक प्रकाशित केले.
हेही वाचा : भर कार्यक्रमात शाहरुख खानने पत्नीचे वय चुकीचे सांगितले, मग झाले असे काही की…
शाहरुख-गौरीप्रमाणे त्यांच्या ‘मन्नत’ बंगल्याचेही त्यांच्या चाहत्यांना कायम आकर्षण असते. पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शाहरुखने करिअरची सुरुवात कशी होती आणि ‘मन्नत’ बंगल्याविषयीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ‘मन्नत’विषयी सांगताना शाहरुख म्हणाला, “एक काळ असा होता जेव्हा ‘मन्नत’ बंगल्याचे इंटिरियर डिझाइन करण्यासाठी आमच्याकडे पुरुसे पैसे नव्हते. तेव्हा कोणत्याही डिझायनरला कॉन्ट्रॅक्ट न देता गौरीने स्वत: ‘मन्नत’चे ‘इंटिरियर डिझाइन’ केले.”
शाहरुख पुढे म्हणाला, “‘इंटिरियर डिझायनर’ म्हणून गौरीच्या करिअरची सुरुवात ‘मन्नत’पासून झाली. आम्ही जेव्हा घर खरेदी केले तेव्हा आम्हाला खूप आवडले, परंतु तेव्हा दिल्लीपेक्षा मुंबईमधील घर एवढे महाग असेल याची आम्हाला कल्पना नव्हती. ‘मन्नत’च्या आधी एका दिग्दर्शकाने दिलेल्या घरात आम्ही दोघे राहत होतो. ‘मन्नत’बंगला खरेदी केल्यावर, मुंबईतील घरे किती महाग आहेत याचा अंदाज आम्हाला आला. तेव्हा हा बंगला अगदी मोडकळीस आला होता. एका ‘इंटिरियर डिझायनरला’ आम्ही बोलावले होते, परंतु त्याने जास्त पैसे मागितले. माझा पगारही तेवढा नव्हता. या काळात गौरीने मला खूप मदत केली. तेव्हा मीच गौरीला म्हणालो, ‘तू डिझायनिंग का सुरू करत नाहीस?’ अशा प्रकारे ‘मन्नत’पासून गौरीचा ‘इंटिरियर डिझायनर’ म्हणून नवा प्रवास सुरू झाला.”
हेही वाचा : अनुष्का शर्माच्या बाईक सवारीचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले; थेट मुंबई पोलिसांना टॅग करीत म्हणाले…
पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यादरम्यान आपल्या घरामध्ये सर्वात जास्त व्यस्त शेड्यूल गौरीचे आहे असेही शाहरुखने आवर्जून सांगितले. दरम्यान, शाहरुख लवकरच ‘जवान’ आणि ‘डंकी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.