९० च्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून दिव्या भारती(Divya Bharti)चे आजही नाव घेतले जाते. वयाची २० वर्षे पूर्ण होण्याआधी २० चित्रपटांत तिने प्रमुख भूमिकांत काम केले होते. सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला होता. त्या काळात गुणी अभिनेत्री म्हणून दिव्या भारतीची ओळख होती. मात्र, वयाच्या १९ व्या वर्षी अभिनेत्रीचा मृत्यू झाला. ५ एप्रिल १९९३ ला अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला. दिव्या भारतीबरोबर अनेक अभिनेत्यांनी काम केले होते. शाहरुख खान(Shah Rukh Khan)ने १९९२ ला बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्याने दिव्या भारतीबरोबर ‘दीवाना’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत काम केले होते. शाहरुख खान एका मुलाखतीत दिव्या भारतीबाबत म्हणाला होता की, ती अभिनेत्री म्हणून अद्भुत होती.

शाहरुख खान काय म्हणाला होता?

एनडीटीव्हीला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत शाहरुख खान दिव्या भारतीबाबत म्हणाला होता, “मी खूप गंभीर व्यक्ती होतो. तर दिव्याला मजा-मस्ती करणे खूप आवडायचे. मला आठवते की, मी मुंबईतील सी-रॉकबाहेर चालत होतो. त्यावेळी दिव्या भारती मला भेटली. ती मला म्हणाली की, तू फक्त अभिनेता नाहीस, तर तू संस्था आहेस. तिच्या त्या बोलण्यानं मी खूप प्रभावित झालो होतो. तिचे ते बोलणे किती अर्थपूर्ण आहे, याची मला जाणीव झाली.”

दिव्या भारतीच्या मृत्यूबाबत बोलताना शाहरुख खान म्हणाला होता, “जेव्हा मला तिच्या निधनाची बातमी कळाली. तेव्हा मी दिल्लीत होतो. माझ्यात घरात झोपलो होतो. दीवाना चित्रपटातील ऐसी दिवानगी हे गाणे वाजत होते. मला वाटत होतो की, मी मोठा स्टार झालो आहे. सकाळी उठल्यानंतर मला समजले की, दिव्या भारतीचा मृत्यू झाला आहे. ती खिडकीतून पडली होती. मला खूप मोठा धक्का बसला होता. मला वाटते की, मी तिच्याबरोबर आणखी एक चित्रपट करणार होतो.”

दिव्या भारतीच्या कामाबाबत बोलायचे, तर अभिनेत्रीने तमीळ चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘नीला पेन्ने’ या चित्रपटात अभिनेत्रीने प्रमुख भूमिका साकारली. १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘बोबिली राजा’ या चित्रपटाने अभिनेत्री लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. या चित्रपटात दग्गुबाती वेंकटेश प्रमुख भूमिकेत होता. त्यानंतर तिने १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘राउडी अल्लुडू’ आणि ‘असेंब्ली राउडी’या चित्रपटात काम केले. अभिनेत्रीने मोहन बाबू आणि चिरंजीवी यांच्याबरोबर काम केले. १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘विश्वात्मा’ या चित्रपटातून दिव्या भारतीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात सनी देओल प्रमुख भूमिकेत होता. त्यानंतर अभिनेत्रीने सुनील शेट्टी, गोविंदा, जॅकी श्रॉफ यांच्याबरोबरही काम केले. ‘बलवान’, ‘शोला व शबनम’, ‘दिल ही तो है’ यांसारख्या चित्रपटांत अभिनेत्रीने काम केले आहे. ‘दिवाना’ या चित्रपटाबरोबरच दिव्या भारती व शाहरूख खानने ‘दिल आशना है’ या चित्रपटात एकत्र काम केले. १९९२ साली अभिनेत्रीचे १२ चित्रपट प्रदर्शित झाले.

शाहरूख खान लवकरच ‘किंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्यांची लेक सुहाना खान व अभिनेता अभिषेक बच्चनदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.