बॉलीवूडचा बादशाह म्हणून शाहरुख खानला ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर शाहरुखने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनयाबरोबरच शाहरुख त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. गेल्यावर्षी त्याचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली होती. या चित्रपटातून शाहरुखने तब्बल चार वर्षांनंतर पुनरागमन केले. पण, शाहरुखने कमबॅक करण्यासाठी चार वर्ष का लावले, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला होता. आता नुकतेच शाहरुखने आपल्या चार वर्षांच्या ब्रेकबाबत खुलासा केला आहे.
नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान शाहरुखने चार वर्ष ब्रेकबाबत भाष्य केले आहे. तो म्हणाला, “गेली ३३ वर्ष मी अभिनय क्षेत्रात काम करत आहे. पहिल्यांदाच मी एवढा मोठा ब्रेक घेतला. या अगोदर मी काही चित्रपट केले होते, मात्र ते चित्रपट एवढे खास चालले नाहीत. त्यामुळे मला वाटलं मी चांगले चित्रपट बनवत नाहीये. पण, ब्रेकनंतर माझ्या ‘पठाण’ व ‘जवान’ चित्रपटाला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला.”
शाहरुख पुढे म्हणाला, मला असे वाटते की आपल्या देशातील आणि बाहेरच्या देशातील लोकांनी मला त्यांच्या हृदयात व माझ्या चित्रपटांना विशेष स्थान दिले आहे. आता चाहते मला अनेकदा चार वर्षांचा ब्रेक नको, तर दोन ते चार महिन्यांचा ब्रेक घेण्याचा सल्ला देतात.”
हेही वाचा- आयरा खान व नुपूर शिखरेने हनीमूनला गेल्यावर काढले मॅचिंग टॅटू, बालीतून शेअर केले फोटो
शाहरुखच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर २०२३ हे वर्ष शाहरुखसाठी खूप खास ठरले. गेल्या वर्षात शाहरुखचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. हे तिन्ही चित्रपट सुपरहिट ठरले होते. शाहरुखच्या ‘जवान’, ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली होती. तसेच त्याच्या ‘डंकी’ चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. लवकरच शाहरुख सलमान खानबरोबर ‘टायगर वर्सेस पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच तो संजय लीला भंसाळींच्या ‘इंशाअल्ला’ चित्रपटातही झळकणार असल्याची चर्चा सुरू आहे.