अभिनेता शाहरुख खान(Shah Rukh Khan) सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. कधी त्याचे चित्रपट, तर कधी त्याची वक्तव्ये यांमुळे तो चर्चांचा भाग बनतो. आता त्याने एका पत्रकार परिषदेत करण जोहरला दिलेल्या सल्ल्यामुळे तो सध्या चर्चेत आहे.
काय म्हणाला शाहरुख खान?
मुंबईत आयफा (IIFA) २०२४ ची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शाहरुख खानने हजेरी लावली होती. शाहरुखने अभिनेता अभिषेक बॅनर्जीचे कौतुक केले. “स्त्री २ या चित्रपटामध्ये तू उत्तम भूमिका साकारली आहेस. चित्रपटात पाहिल्यानंतर आता तुला समोर पाहून आनंद झाला. मला तुला कॉल करायचा होता,” असे म्हणत किंग खानने त्याच्या अभिनयाचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.
पुढे बोलताना त्याने म्हटले, “मी हा शो होस्ट करणार असल्याचा खूप आनंद आहे. सिद्धार्थ, करण, विकी यांच्याबरोबरच इतरही प्रतिभावान व्यक्तींसोबत होस्टिंग करण्याची मला संधी मिळत आहे. त्याबद्दल मी आभार मानतो. या सोहळ्यात शाहिद कपूर, जान्हवी कपूर, क्रिती सेनॉन, विकी कौशल व दिग्गज अभिनेत्री रेखादेखील परफॉर्म करणार असल्याने मी हा शो होस्ट करण्यासाठी उत्सुक आहे आणि मी हा माझा सन्मान समजतो.”
तू १० वर्षांनंतर आयफामध्ये येत आहेस. तू जेव्हा जेव्हा आयफामध्ये हजेरी लावली होतीस, त्यावेळी मजा आली होती. आता दशकानंतर परत येऊन घरी परत आल्यासारखे वाटत आहे का?, असे करण जोहरने विचारताच शाहरुख खानने, “इतके कौतुक केलेस; पण एकदाच शो होस्ट करण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर आता १० वर्षांनी बोलावले. पण, मला इथे परत येऊन खूप आनंद झाला आहे,” असे विनोद करीत म्हटले.
पुढे तो म्हणतो, “मला नेहमीच आयफाच्या शोला हजर राहायचे होते; पण ज्या ज्या वेळी हा शो जगभरात होस्ट केला जात होता, त्या त्या वेळी मी माझ्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असायचो. इंडियन सिनेमाला जगभरात पोहोचवण्याचे आयफाचे ध्येय आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यामध्ये हिंदी, मल्याळम, तेलुगू, तमीळ व कन्नड या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. ही खूप चांगली बाब आहे.”
शाहरुख खानने करण जोहरला म्हटले की, तू रिहर्सलसाठी ये. त्यावेळी करण नाही म्हणाला. त्यानंतर शाहरुखने त्याची फिरकी घेत सगळ्यांना सांगितले की, याने मला सांगितले आहे की, हा झूमवर रिहर्सल करणार आहे. ‘मी रिहर्सल झूमवर करतो. कारण- खूप फिल्म शो, चॅट शो असे सगळ्या प्रकारचे शो होस्ट करतो’, असे त्याने मला सांगितले आहे. पण- करण तू चित्रपटदेखील बनव, असा सल्ला शाहरुखने करणला दिला.
याबरोबरच ‘आयफा उत्सवम’देखील त्याच वेळी पार पडणार असून, राणा दग्गुबाती त्याचे सूत्रसंचालन करणार आहे. आयफा उत्सवममध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा सन्मान केला जाणार आहे. या पत्रकार परिषदेत अभिनेता राणा दग्गुबाती जेव्हा स्टेजवर आला त्यावेळी त्याने शाहरुखचे कौतुक केले. त्याने म्हटले, “शाहरुख हा फक्त चांगला अभिनेताच नाही, तर उत्तम माणूसदेखील आहे.”
दरम्यान, २७ सप्टेंबर ते २९ सप्टेंबरदरम्यान यास आयलंड, अबू धाबी येथे आयफाचा सोहळा पार पडणार आहे