‘किंग ऑफ रोमान्स’, ‘बाहशहा’ अशी ओळख असलेल्या शाहरुख खानची आणखी एका गोष्टीमुळे चर्चा असते आणि ती गोष्ट म्हणजे त्याचं राहतं घर ‘मन्नत’. वांद्रे येथील बॅण्डस्टँडपासून अगदी हाकेच्या अंतरावर शाहरुखचा ‘मन्नत’ बंगला स्थित आहे. अभिनेत्याच्या वाढदिवशी त्याचे लाखो चाहते त्याच्या घराबाहेर गर्दी करतात. शाहरुखचा वाढदिवस आणि मन्नत याचं एक वेगळं समीकरण गेल्या काही वर्षात तयार झालेलं आहे.
परदेशात फिरायला येणारे पर्यटक सुद्धा आवर्जून मन्नत पाहण्यासाठी गर्दी करतात. पण, किंग खान त्याची ही प्रिय ‘हवेली’ काही दिवसांसाठी सोडून जाणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. शाहरुख मन्नत का सोडतोय, यामागचं नेमकं कारण काय आहे याबद्दल जाणून घेऊयात…
शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्याची किंमत आजच्या घडीला जवळपास २०० कोटींच्या घरात आहे. अभिनेता व त्याचे कुटुंबीय जवळपास २५ वर्षांपासून या घरात वास्तव्यास आहेत. ‘हिंदुस्थान टाइम्स’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता लवकरच ‘मन्नत’मध्ये नुतनीकरणाचं काम सुरू होणार आहे. रिपोर्ट्सनुसार हे काम याचवर्षी मे महिन्याच्या आधी सुरू करण्यात येणार आहे. या नुतनीकरणामध्ये बंगल्याचा काही भाग विस्तारीत करण्यात येणार आहे. यासाठी किंग खानला कोर्टाकडून देखील परवानगी मिळाली आहे.
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये गौरी खानने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) कडून मन्नतमध्ये दोन अतिरिक्त मजले जोडण्याची परवानगी मागितली होती. अतिरिक्त मजले जोडल्यास याचं बांधकाम क्षेत्र ६१६.०२ चौरस मीटरने वाढेल. ‘मन्नत’ बंगल्याचा समावेश ग्रेड ३ ऐतिहासिक वारसा स्थळांमध्ये केला जातो. यामुळेच कोणताही संरचनात्मक बदल करण्याआधी अधिकृत परवानगीची गरज असते. ही परवानगी आता अधिकृतरित्या देण्यात आली आहे. ‘मन्नत’चा भाग विस्तारीत करण्यासाठी शाहरुख कुटुंबीयांना २५ कोटींचा खर्च येणार आहे. याच पार्श्वभूमीवर शाहरुख खान काही दिवस ‘मन्नत’ सोडून वेगळ्या ठिकाणी राहायला जाणार आहे. काम पूर्ण होईपर्यंत याठिकाणी केवळ कामगारच उपस्थित असतील. बाकी संपूर्ण कुटुंब भाड्याच्या घरात राहायला जाणार आहे.
शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या कंपनीने प्रसिद्ध निर्माते वासु भगनानी यांचा मुलगा अभिनेता जॅकी भगनानी व त्यांची मुलगी दीपशिखा देशमुख यांच्याबरोबर करार केला आहे. खान कुटुंबीय वांद्रे पश्चिम येथील पूजा कासामध्ये शिफ्ट होणार आहेत. ही जागा जॅकी व दीपशिखा यांच्या मालकीची आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’शी संवाद साधताना एका सूत्राने सांगितलं की, “ही जागा मन्नत एवढी मोठी नाहीये. पण, प्रत्येक मजल्यावर फक्त एकच फ्लॅट आहे. किंग खानच्या सुरक्षारक्षकांना आणि इतर कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी ही जागा पुरेशी आहे.” शाहरुख खान चार मजल्यांसाठी मासिक २४ लाख रुपये भाडं देईल असं सांगितलं जात आहे.