किंग खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान होय. आपल्या अभिनयाने या किंग खानने वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अभिनयाबरोबरच त्याच्या वागण्याचे अनेकदा त्याच्या सहकलाकारांकडून कौतुक होताना दिसते. संपूर्ण जगभरात शाहरुख खानचे चाहते असल्याचे पाहायला मिळते.
आता हा अभिनेता नुकताच आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये सूत्रसंचालन करताना दिसून आला. या सोहळ्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत असून, नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
शाहरुख खानच्या सूत्रसंचालनाचा व्हिडीओ व्हायरल
२९ सप्टेंबरला एका व्यक्तीने ‘एक्स’वर व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ आयफा पुरस्कार सोहळ्यातील शाहरुख खानचा आहे. त्यामध्ये तो २०२३ वर्ष हे भारतीय सिनेमांसाठी ब्लॉकबस्टर ठरल्याबद्दल बोलताना दिसत आहे. आता या युजरने शाहरुखसमोर मोठा टेलिप्रॉम्प्टर असल्याचे व्हिडीओमध्ये रेकॉर्ड केले आहे. या टेलिप्रॉम्प्टरच्या साह्याने तो सूत्रसंचालन करीत आहे. या युजरने हा व्हिडीओ शेअर करताना, ‘शाहरुख खानने आयफा २०२४ चे सूत्रसंचालन टेलिप्रॉम्प्टरच्या मदतीने केले’, अशी कॅप्शन दिली आहे.
Shah Rukh Khan used a teleprompter while hosting the IIFA 2024 awards show#ShahRukhKhan #IIFA2024 pic.twitter.com/OLjnhkTzDE
— Surajit (@surajit_ghosh2) September 29, 2024
हा व्हिडोओ व्हायरल होत असून, नेटकरी त्यावर कमेंट करीत असल्याचे दिसत आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी त्याची बाजू घेत ‘ही फार मोठी गोष्ट नाही’, असे म्हटले आहे. कोणत्याही कार्यक्रमासाठी स्क्रिप्ट वापरणे ही सामान्य बाब आहे आणि टेलिप्रॉम्प्टर वर्षानुवर्षे वापरला जातो, असे चाहत्यांनी म्हटले. मात्र, ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केला, तो सलमान खानचा चाहता असल्याचे बायोमध्ये लिहिले आहे. त्यामुळे शाहरुख आणि सलमान खानच्या चाहत्यांमध्ये ऑनलाइन शाब्दिक वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.
एका नेटकऱ्याने म्हटले, “टेलिप्रॉम्प्टर याच कारणासाठी बनवले गेले आहेत.” तर अनेकांनी टेलिप्रॉम्प्टर वापरणे सामान्य बाब असून, शाहरुखची बदनामी करण्यासाठी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आल्याचे म्हटले. एका नेटकऱ्याने म्हटले, “काय समस्या आहे? यूट्यूबवरील शो, कपिल शर्मासारखे शो, प्रत्येक गोष्टीची स्क्रिप्ट असते. काही लोक प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता शोधतात.”
शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचे तर, तो लवकरच ‘किंग’ या चित्रपटात दिसणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटात त्याची लेक सुहाना खानदेखील असणार आहे.