बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खान(Shah Rukh Khan) लवकरच ‘किंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याची लेक सुहाना खानदेखील दिसणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चनदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आता ‘डंकी’ या चित्रपटानंतर शाहरूख प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. याबरोबरच अभिनेता शाहरुख खानने मन्नत या त्याच्या २७ हजार स्क्वेअर फूट सी-फेसिंग बंगल्याचे नूतनीकरण करणार आहे. त्यासाठी तो आपल्या कुटुंबासह भाड्याच्या एका अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार असल्याची माहिती समोर आली होती. अशातच अभिनेत्याची पत्नी गौरी खानने नुकतेच मुंबईमधील दादर पश्चिम येथील अपार्टमेंट विकले आहे. जाणून घेऊयात हे अपार्टमेंट किधी व किती किंमतीला विकले होते, तसेच आता हे अपार्टमेंट किती रूपयांना विकले आहे.
तीन वर्षात झाला तब्बल ३७ टक्के नफा
स्क्वेअर यार्ड्सकडे असलेल्या नोंदणी कागदपत्रांनुसार गौरी खानने हा फ्लॅट ऑगस्ट २०२२ मध्ये ८.५ कोटींना विकत घेतला होता. आता हा फ्लॅट ११. ६१ कोटींना विकला आहे. गौरी खानला या व्यवहारात तीन वर्षांत ३७ टक्के फायदा झाला आहे. हा फ्लॅट कोहिनूर सीटीएनएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रायव्हेट लिमिटेडने विकसित केलेल्या कोहिनूर अल्टिसिमा येथे आहे. या प्रकल्पात २.५ बीएचके, ३ बीएचके आणि ३.५ बीएचके अपार्टमेंट आहेत. गौरीचा फ्लॅट २१ व्या मजल्यावर आहे. या फ्लॅटचे क्षेत्रफळ जवळजवळ २००० चौरस फूट आहे. इतर सुखसोईंबरोबरच या फ्लॅटला दोन गाड्यांची पार्किंगची व्यवस्था आहे. Zapkey नुसार हा व्यवहार २८ मार्चला झाला आहे.
मन्नतचे नूतनीकरण होण्यास जवळजवळ दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. या कालावधीत शाहरूख खान त्याच्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहणार आहे. तो पाली हिल येथे राहणार आहे. हे अपार्टमेंट निर्माते वाशू भगनानी यांच्या मालकीचे आहे. शाहरूख खानने हे अपार्टमेंट तीन वर्षांसाठी ८. ६७ कोटींना विकत घेतले आहे. एक डुप्लेक्स अपार्टमेंट हे जॅकी भगनानी व दीपशिखा देशमुख या बहिण भावांच्या मालकीचे आहे. याचे ११. ५४ लाख प्रति महिना भाडे आहे. तर दुसरे अपार्टमेंट हे वाशू भगनानी यांच्या मालकीचे आहे. याचे प्रतिमहिना भाडे १२. ६१ लाख इतके आहे.
दरम्यान, शाहरूख खान व त्याच्या दोन्ही मुलांनी मुफासा द लायन किंग या चित्रपटात त्यांचा आवाज दिला होता. आता अभिनेत्याला एका नवीन भूमिकेत पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.