हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेमकथा असलेले अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तरीही सातत्याने वेगवेगळी कथाकल्पना घेऊन नवे नवे प्रेमपट रसिकांसमोर येत असतात. याच प्रेमपटांच्या लाटेत ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ असं लांबलचक नाव असलेल्या नव्या प्रेमपटाचा समावेश झाला आहे. एखाद्या तरुणीच्या प्रेमात ठार बुडून जावं, तिच्याशीच जन्मभराची गाठ बांधायची या निर्धाराने प्रेमरंगात रंगून जावं अशा विचारात असलेल्या तरुणाला आपली प्रेयसी जिवंत हाडामासाची व्यक्ती नसून एक रोबोट आहे हे कळल्यानंतर काय घडतं.. याचं चित्रण ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता शाहिद कपूर आणि त्याचं धमाकेदार नृत्य या दोन्ही गोष्टी चर्चेत आल्या आहेत.

शाहिद या चित्रपटात पहिल्यांदाच क्रिती सननबरोबर काम करताना दिसणार आहे. शिवाय, अभिनेत्री डिंपल कपाडिया आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेद्र यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. अमित जोशी आणि आराधन साह लिखित आणि दिग्दर्शित ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’  हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाच्यानिमित्ताने शाहिद कपूरने माध्यमांशी मनमोकळया गप्पा मारल्या.

हेही वाचा >>> Main Atal Hoon Movie Review : ‘अटल’ निश्चयाचा रंजक प्रवास

या चित्रपटाच्या निमित्ताने क्रितीबरोबर पहिल्यांदाच काम करण्याचा अनुभव कसा होता याबद्दल बोलताना गेली तीन-चार वर्ष आपण क्रितीबरोबर काम करण्याची संधी शोधत होतो, असं शाहिदने सांगितलं. ‘या चित्रपटाच्या निमित्ताने तिच्याबरोबर काम करण्याची माझी इच्छा पूर्ण झाली. मी तिचं काम बघितलं आहे. एक कलाकार म्हणून मला ती नेहमी काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करताना दिसते. तिच्या पहिल्या चित्रपटापासूनच ती अभिनयासाठी घेत असलेली मेहनत दिसून येते. जेव्हा मी पहिल्यांदा तिला भेटलो, तेव्हा नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची तिची जिज्ञासा मला जाणवली.  तिची जिज्ञासा आणि ती घेत असलेली मेहनत यामुळेच एक उत्तम अभिनेत्री म्हणून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत नावलौकिक कमावला आहे’ अशा शब्दांत शाहिदने क्रितीचे कौतुक केले.

चित्रपटाची कथाकल्पना वेगळी असली तरी हा अत्यंत साधा-सरळ चित्रपट असल्यामुळे आम्ही हा चित्रपट करताना खूप मजा केली. दोन किंवा तीन टेक फारतर.. त्यापेक्षा अधिक टेक घेण्याची गरजच आम्हाला कधी भासली नाही, असं सांगणाऱ्या शाहिदने क्रिती रोबोटची भूमिका साकारत असल्याने तिची भूमिका अधिक अवघड होती आणि तिने ती उत्तमपणे साकारली आहे, असंही सांगितलं.

जिम करता करता..

‘मी आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक अमित जोशी जिममध्ये भेटलो होतो आणि तेव्हा त्याच्याशी गप्पा मारता मारता या चित्रपटाचा विषय निघाला’, अशी माहिती शाहिदने दिली. ‘अमितच्या प्रत्येक गोष्टीतून काही तरी शिकण्यासारखं असतं. जिममधील भेटीत चित्रपट करण्याविषयी चर्चा झाल्यानंतर पुढे चित्रीकरणाआधी आमच्या वारंवार बैठका झाल्या. हा चित्रपट करत असताना मी आणि क्रितीने त्याला खूप जास्त प्रश्न विचारून भंडावून सोडलं होतं, पण त्याच्याकडे आमच्या प्रत्येक प्रश्नासाठी उत्तर असायचं. त्याला आम्ही काही नवीन सुचवलं तरी तो त्यासाठी सहमत असायचा, त्यामुळे त्याच्याबरोबर काम करताना एक अभिनेता म्हणून देखील खूप काही शिकायला मिळालं’, अशी भावना शाहिदने व्यक्त केली.

प्रेमकथा नेहमीच आव्हानात्मक

हा चित्रपट प्रेमकथेवर आधारित असला तरी तो मूळ विनोदी धाटणीचा आहे. कौटुंबिक नाटय या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे आणि असे प्रेमपट करणं हे मला नेहमीच आव्हानात्मक वाटतं, असं शाहिद म्हणतो. ‘मी दर महिन्याला किमान १० नवीन चित्रपटांच्या कथा वाचत असतो, पण ही कथा वाचताना मला स्वत:ला खूप मजा आली. मी स्वत: या कथेचा आनंद घेत होतो. मला नेहमी अनेक लोक सांगतात, सतत नवीन काम करत राहा, पण प्रेमकथेत देखील अनेक नवीन गोष्टी करायला मिळतात. मी जेव्हा ‘कबीर सिंग’ करत होतो तेव्हा ते पात्रं माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होतं. मी पहिल्यांदा कबीर सिंगची कथा ऐकून आश्चर्यचकित झालो होतो, पण तरी प्रेक्षकांनी त्या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं. तसंच, या चित्रपटाच्या वेळी देखील ही कथा मला आवडल्यामुळे हा चित्रपट मी केला’, असंही त्याने सांगितलं.

सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोट या तंत्रज्ञानात खूप प्रगती होते आहे. चित्रपटातून भविष्यावर भाष्य करणं हे फार महत्त्वाचं काम असतं. चित्रपटातून प्रेक्षक अशा गोष्टींचा अनुभव घेतात, ज्या त्या त्या काळातील बदल म्हणून माहिती असल्या तरी वर्तमान आयुष्यात त्यांचा अनुभव घेता येतोच असं नाही. या बदलत्या जगात नक्कीच हे आधुनिक तंत्रज्ञान माणसाच्या फार जवळचं झालेलं असेल आणि कदाचित याची सुरुवात आधीच झाली आहे. आता भविष्यात तंत्रज्ञान माणसांची जागा घेऊ शकते का? यावर सगळीकडे चर्चा झडत आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान आणि माणूस यांच्यातील याच नात्याचा वेध घेणारा ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ हा चित्रपट नक्कीच वेगळा ठरेल. शाहिद कपूर

Story img Loader