कधी ‘राजीव माथूर’, कधी ‘आदित्य कश्यप’ तर कधी ‘कबीर सिंग’च्या रुपातून प्रेक्षकांची मनं जिंकणारा शाहिद कपूर लवकरच एका नव्या भूमिकेतून भेटीस येत आहे. एका अॅक्शन थ्रिलर चित्रपटात शाहिद पाहायला मिळणार आहे. याचं चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच समोर आलं असून यामधील शाहिद कपूरच्या किलर लूकची चर्चा होतं आहे.
बॉलीवूडचा ‘चॉकलेट बॉय’, ‘राऊडी हिरो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहिद कपूरच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘देवा’ असं आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच निर्मात्यांनी ‘देवा’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करून प्रेक्षकांमधील उत्सुकता अजूनच शिगेला पोहोचवली आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘देवा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील समोर आली आहे.
अभिनेता शाहिद कपूरने स्वतःचं ‘देवा’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये शाहिद कपूरचा दमदार लूक पाहायला मिळत आहे. फॉर्मल कपडे, डोळ्यावर गॉगल, तोंडात सिगारेट अशा किलर लूकमध्ये शाहिद दिसत आहे. या पोस्टरच्या मागे ९०च्या दशकातील आइकॉनिक, महानायक अमिताभ बच्चन पाहायला मिळत आहेत. शाहिद आणि अमिताभ बच्चन एका पोस्टरमध्ये असल्यामुळे चित्रपटात काहीतरी धमाकेदार असल्याचा इशारा दिला जात आहेत.
शाहिदच्या ‘देवा’ चित्रपटाच्या पोस्टरबरोबर मागे लावलेल्या मराठी रॅपने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. “बघ आला तुझा बाप…देवा आपल्या मर्जीचा मालिक…जे ऐकत नाहीत ते कानाखाली खातील…शहाणपणा शिकवून नको अजिबात…फुकटमध्ये देवा घरी जाशील” अशा रॅपच्या जबरदस्त ओळी ऐकायला मिळत आहेत. ‘मर्जीचा मालिक’ असं या रॅपचं नाव आहे.
दरम्यान, शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाच दिग्दर्शन लोकप्रिय मल्याळम दिग्दर्शक रोशन एंड्रयूज यांनी केलं आहे. जी स्टुडिओज आणि रॉय कपूर फिल्म्स निर्मित ‘देवा’ चित्रपट ३१ जानेवारी २०२५ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहिद पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याच्या सोबतीला अभिनेत्री पूजा हेडगे असणार आहे. तसंच कुबरा सैत आणि पवेल गुलाटीसह बरेच कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.