बॉलीवूडचा चॉकेलट बॉय म्हणून ओळखला जाणारा शाहिद कपूर नेहमीच चर्चेत असतो. आतापर्यंत शाहिदने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर शाहिदने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. २००३ मध्ये शाहिदने ‘इश्क विश्क’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. आज शाहिद बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता मानला जात असला तरी एक काळ असा होता, जेव्हा शाहिदला या इंडस्ट्रीत आपली जागा बनवण्यासाठी खूप धडपड करावी लागली होती. एका मुलाखतीत शाहिदने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील काही आठवणी शेअर केल्या आहेत.

नुकतेच शाहिदने नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात शाहिदने त्याच्या शालेय जीवनापासून बॉलीवूड पदार्पणापर्यंत अनेक घटनांचा खुलासा केला. शाहिद म्हणाला, मी जेव्हा दिल्लीवरून मुंबईत आलो, तेव्हा शाळेत मला वर्गातील मित्रांनी कधीच स्वीकारले नाही. मी बाहेरचा मुलगा म्हणूनच राहिलो, कारण माझं वागणं दिल्लीतील लोकांसारखं होतं. अनेक दिवस मला वाईट पद्धतीची वागणूक देण्यात आली.

हेही वाचा- अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी, पाहा व्हिडीओ

शाहिद पुढे म्हणाला, “जेव्हा मी इंडस्ट्रीत आलो तेव्हा मला जाणवले की, बॉलीवूड इंडस्ट्रीसुद्धा शाळेप्रमाणेच आहे. इथे बाहेरच्या लोकांना सहज स्वीकारले जात नाही. बाहेरून एखादी व्यक्ती जेव्हा इंडस्ट्रीत येते तेव्हा इथल्या लोकांना तो एक समस्येसारखा वाटू लागतो. मला गटबाजी बिलकूल आवडत नाही. या इंडस्ट्रीत गटबाजी मोठ्या प्रमाणात केली जाते. तुम्ही जर एखाद्याला पसंत करत नसाल तर त्याला कमीत कमी खाली पाडण्याचा किंवा त्याला संधी मिळू नये यासाठी प्रयत्न करणे, असे प्रकार तरी करू नका.”

१०० ऑडिशननंतर मिळालेला पहिला चित्रपट

शाहिद कपूरने ‘इश्क विश्क’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्याबरोबर अमृता राव आणि शेनाज ट्रेझरीवाला यांची प्रमुख भूमिका होती. त्यावेळी हा चित्रपट चांगलाच गाजला होता. पण, जवळपास १०० ऑडिशन दिल्यानंतर शाहिदला हा चित्रपट मिळाला होता. ‘इश्क विश्क’ चित्रपटानंतर शाहिद एका रात्रीत प्रसिद्धीझोतात आला. त्यानंतर त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

हेही वाचा- ‘दृश्यम’बद्दल मोठी अपडेट समोर; कोरीअन रिमेकनंतर आता चित्रपटाचा बनणार आता हॉलिवूडमध्ये रिमेक

शाहिदच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर नुकताच त्याचा ‘तेरी बात में ऐसा उलझा जिया’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्याबरोबर क्रिती सेनॉनची प्रमुख भूमिका आहे. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. लवकरच शाहिदचा ‘देवा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्याबरोबर साऊथची सुपरस्टार पूजा हेगडे झळकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Story img Loader