बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या ‘देवा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो आपल्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. शाहिदने नुकतीच इंडियन एक्सप्रेसच्या स्क्रीन लाइव्ह इव्हेंटला हजेरी लावली. इथे त्याने त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या. अभिनेता त्याच्या व करीना कपूरच्या ‘जब वी मेट’ या सुपरहिट चित्रपटाबद्दलही व्यक्त झाला.
‘जब वी मेट’ २००७ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाला १८ वर्षे झाली आहेत. या चित्रपटात अभिनेत्री करीना कपूर व अभिनेता शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या. शाहिद व करीना रिलेशनशिपमध्ये होते आणि या सिनेमाचं शूटिंग करतानाच त्यांचं ब्रेकअप झालं. ‘जब वी मेट’चं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं होते. लोकांना हा चित्रपट खूप आवडला. यामध्ये शाहिदने ‘आदित्य’ची भूमिका साकारली होती तर करीना ‘गीत’च्या भूमिकेत दिसली होती. जुलै २०२४ मध्ये स्क्रीनच्या इव्हेंटमध्ये दिग्दर्शक इम्तियाज अली यांना या सिनेमातील पात्र गीत आणि आदित्य आता तुम्ही कुठे पाहता? असं विचारण्यात आलं होतं. त्यावर त्यांनी घटस्फोटासाठी वकिलाच्या कार्यालयात, असं उत्तर दिलं होतं.
शाहिद कपूर काय म्हणाला?
इम्तियाज अली यांचे उत्तर ऐकून तेव्हा सर्वजण खूप हसले होते. त्यानंतर आता शाहिदने इम्तियाज यांच्या त्या उत्तरावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचा व्हिडीओ पाहून शाहिद हसला आणि म्हणाला, “गीत आणि आदित्य यंचं आता ब्रेकअप झालं असतं. कंटाळले असते ते एकमेकांना. आदित्य म्हणतोय गीतचे स्वतःवरच खूप प्रेम आहे, त्यामुळे तिला कोण सहन करेल.”
तुझ्या या उत्तराने अनेक चाहत्यांना वाईट वाटेल, असं म्हटल्यावर शाहिद म्हणाला, “जर आमच्या चित्रपट निर्मात्याला असं वाटत असेल की हे दोघं एकमेकांना घटस्फोट देतील, तर मध्ये बोलणारा मी कोण आहे? मी फक्त एक अभिनेता आहे.”
दरम्यान, २६ ऑक्टोबर २००७ ला रिलीज झालेल्या ‘जब वी मेट’ या सिनेमाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. जवळपास १५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० कोटींहून जास्त कमाई केली होती.