सूरज बडजात्या दिग्दर्शित विवाह हा चित्रपट २००६ साली प्रदर्शित झाला. त्यावेळी शाहिद कपूर(Shahid Kapoor) व अमृता राव यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाने धूमाकूळ घातला होता. हृदयस्पर्शी कथा आणि कलाकारांचा अफलातून अभिनय, यामुळे या चित्रपटाला मोठी लोकप्रियता मिळाली. आजही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रेम मिळताना दिसते. आता शाहिद कपूरने एका मुलाखतीत विवाह चित्रपटावेळी त्याने सूरज बडजात्या यांना त्याला चित्रपटातून काढून टाकावे अशी विनंती केली होती, अशी आठवण सांगितली आहे. याबरोबरच, त्यावर दिग्दर्शकाची प्रतिक्रिया काय होती, शाहिदने असे म्हणण्यापाठीमागे नेमके काय कारण होते? याचादेखील अभिनेत्याने खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माझंच नशीब…

बॉलीवू़ड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत शाहिद कपूरने म्हटले, “मला आठवतं की जेव्हा मी विवाह चित्रपटाचे शूटिंग करत होतो, त्यावेळी माझे एकाच महिन्यात तीन चित्रपट फ्लॉप झाले होते. आम्ही ८-९ दिवस विवाह चित्रपटाचे शूटिंग केले, त्याचवेळी माझे काही चित्रपट अपयशी ठरले. मी सूरज बडजात्यांकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माझ्याऐवजी दुसरे कोणालाही घेऊ शकता. जर माझे एका महिन्यात तीन चित्रपट फ्लॉप ठरत असतील तर माझ्याबरोबर कोणी का काम करेल? या तीन चित्रपटांतील एक संजय दत्त यांच्याबरोबरचा होता, एक अजय देवगण आणि तिसरा अक्षय कुमारबरोबर होता. हे सगळे मोठे स्टार होते, त्यामुळे मला असे वाटले की माझंच नशीब वाईट आहे.

पुढे याबद्दल अधिक बोलताना अभिनेत्याने म्हटले, “मी सूरज बडजात्या यांना माझ्याऐवजी दुसरे कोणालातरी घेण्याविषयी सुचवल्यानंतर त्यांनी मला म्हटले होते की, जर तुला कॅमेरासमोर काय करायचे हे माहीत असेल तर ते तू कर. बाकी सगळं माझ्यावर सोड. विवाह त्यावेळचा माझा सर्वात गाजलेला चित्रपट ठरला. सूरज बडजात्या त्यावेळी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे विवाह व सूरज बडजात्याबरोबरची ही सर्वात चांगली आठवण आहे”, असे म्हणत कठीण काळात सूरज बडजात्या खंबीरपणे त्याच्या पाठीमागे उभे होते, असे त्याने म्हटले आहे.

दरम्यान, विवाह हा चित्रपट २००६ सालचा सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला. त्याच्या सलग तीन फ्लॉप चित्रपटानंतर विवाहने त्याच्या करिअरला एक वेगळी दिशा दिली. विवाह चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या एक वर्षानंतर शाहिद कपूरने इम्तियाज अली यांच्या जब वी मेट या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. यामध्ये करीना कपूर मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाला मोठे यश मिळाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, शाहिदचे फ्लॉप झालेले हे तीन चित्रपट म्हणजे ‘वाह! लाइफ हो तो ऐसी’, ‘शिखर’ व ‘दिवाने हुए पागल’ हे तीन चित्रपट आहेत. हे तीनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले होते. लवकरच, अभिनेता देवा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid kapoor reveals he urged sooraj barjatya to fire him from vivah also shares reason nsp