‘चॉकलेट बॉय’म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहिद कपूरने आता स्वतःची प्रतिमा पूर्णपणे बदलली आहे. आधी एकाच पठडीतील चित्रपट करणाऱ्या शाहिदने ‘उडता पंजाब’पासून हटके भूमिका आणि कथानक निवडत स्वतःला एक अभिनेता म्हणून पुन्हा सिद्ध केलं. आज शाहिद एकाहून एक असे सरस चित्रपट करताना दिसत आहे, पण आजही त्याला एक चित्रपट नाकारल्याचा पश्चात्ताप होतो.
याबद्दल शाहिदने नुकतंच भाष्य केलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपियाच्या टॉक शोमध्ये नुकतीच शाहिद कपूरने हजेरी लावली. यावेळी त्याने बऱ्याच गोष्टींवर भाष्य केलं अन् मनमोकळ्या गप्पाही मारल्या. याच टॉक शोदरम्यान शाहिदने आमिर खानबरोबर काम करायची संधी हुकल्याबद्दल खुलासा केला. २००६ साली प्रदर्शित झालेल्या राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘रंग दे बसंती’चा किस्सा शाहिद कपूरने या मुलाखतीदरम्यान सांगितला.
आणखी वाचा : “देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने…”, ध्रुव राठीच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओचं किरण मानेंनी केलं कौतुक
या चित्रपटातील दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थने साकारलेल्या पात्रासाठी शाहिद कपूरला विचारण्यात आलं होतं, पण तारखांच्या गोंधळामुळे शाहिदला तो चित्रपट करता आला नाही ज्याचं त्याला अजूनही वाईट वाटतं. याविषयी बोलताना शाहिद म्हणाला, “मला तो चित्रपट करता आला नाही याचा पश्चात्ताप आजही होतो. त्यांनी मला सिद्धार्थच्या भूमिकेसाठी विचारलं होतं. मी चित्रपटाची कथा वाचताना प्रचंड भावुक झालो आणि अक्षरशः रडलो होतो, पण दुर्दैवाने मला या भूमिकेसाठी वेळ देता आला नाही याचं दुःख वाटतं.”
सिद्धार्थच्या या भूमिकेसाठी आधी अभिषेक बच्चनलाही विचारण्यात आले होते. २००६ साली आलेल्या ‘रंग दे बसंती’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धुमाकूळ घातला होता. यामध्ये आमिर खान, अतुल कुलकर्णी, सोहा अली खान, शर्मन जोशी, कुणाल कपूरसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटातील आमिर खानच्या भूमिकेसाठी राकेश ओमप्रकाश मेहरा यांची पहिली पसंती हृतिक रोशन हा होता, पण हृतिकनेही भूमिका नाकारली अन् अखेर हा चित्रपट आमिर खानकडे आला अन् बॉक्स ऑफिसवर त्याने इतिहास रचला.