यंदाचं वर्षं हे बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरसाठी उत्तम ठरलं. यावर्षी चित्रपटगृहात शाहिदची जादू चालली नसली तरी यावर्षी त्याने ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ पाडली. शाहिदची ‘फर्जी’सारखी वेबसीरिज आणि ‘ब्लडी डॅडी’सारखा चित्रपट हे ओटीटीवर प्रदर्शित झाले आणि त्यांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आता नुकतंच शाहिदने त्याच्या आगामी ‘देवा’ चित्रपटाबद्दल नवी अपडेट दिली आहे.
आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शाहीदने त्याच्या आगामी ‘देवा’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला असून याच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. शाहिदचा ‘देवा’ पुढील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये दसऱ्याच्याच मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. एक वर्ष आधीच शाहिदने त्याच्या या चित्रपटाची तारीख पक्की केली आहे.
आणखी वाचा : सेल्फीसाठी गाडीवरून पाठलाग करणाऱ्या चाहत्यावर अरिजित सिंह संतापला; गाडी थांबवून केली तरुणाची कानउघडणी
शाहिदचा हा फर्स्ट लुक त्याच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. ‘देवा’मधला हा शाहिदचा नवा अवतार लोकांना चांगलाच पसंत पडला आहे. पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट, बारीक हेअर कट, डोळ्यांवर गॉगल आणि हातात पिस्तूल असा शाहिदचा रावडी लुक त्याच्या चाहत्यांना चांगलाच पसंत पडला आहे. या लुकवरुन शाहिद या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
चाहत्यांनी शाहिदच्या नव्या लुकची चांगलीच प्रशंसा केली आहे. ‘देवा’मध्ये शाहिद कपूरसह पूजा हेगडेसुद्धा झळकणार आहे. हा चित्रपट रोशन एंड्रयूज यांनी दिग्दर्शित केला आहे. निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘देवा’ ही एका क्रांतिकारी पोलिस अधिकाऱ्याची गोष्ट आहे. याबरोबरच शाहिद क्रीती सेनॉनबरोबर एका रोमॅंटिक चित्रपटातही झळकणार आहे ज्याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही.