Deva Box Office Collection Day 2: शाहिद कपूरचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘देवा’ चित्रपट ३१ जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहिदसह अभिनेत्री पूजा हेगडे प्रमुख भूमिकेत झळकली आहे. शाहिद आणि पूजाच्या ‘देवा’ चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पहिल्या दिवशी चित्रपटाने चांगली कमाई केली होती. या वर्षातला ओपनिंग डेचा सर्वाधिक कमाई करणारा ‘देवा’ दुसरा चित्रपट आहे. आता ‘देवा’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमावले? हे समोर आलं आहे.
सॅकनिल्कच्या माहितीनुसार, शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाने प्रदर्शित होताच म्हणजे पहिल्या दिवशी ५.५० कोटींचा व्यवसाय केला होता. त्यानंतर शनिवारी, १ फेब्रुवारीला चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली. ‘देवा’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ६.२५ कोटींचा गल्ला जमवला. याचाच अर्थ चित्रपटाच्या कमाईत १६.७३ टक्के वाढ पाहायला मिळत आहे. आतापर्यंत ‘देवा’ चित्रपटाने एकूण ११.७५ कोटींची कमाई केली आहे.
अलीकडेच प्रोडक्शन हाउस जी स्टुडियोजने म्हटलं होतं की, ‘देवा’ चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं नेट बॉक्स ऑफिक्स कलेक्शन ५.९८ कोटी असून डोमेस्टिक ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन ६.२८ कोटी आहे. तर ओव्हरसीज जीबीओसीसह ‘देवा’ने पहिल्या दिवशी एकूण १०.३० कोटींची कमाई ग्लोबल ग्रॉसवर केली आहे.
शाहिदच्या ‘देवा’ चित्रपटाची पहिल्या दोन दिवसांची कमाई त्याचा ‘जर्सी’ चित्रपटापेक्षा ( ३.१ कोटी, ४.१ कोटी ) चांगली आहे. पण शाहिदचा दुसरा सुपरहिट चित्रपट ‘तेरी बातों मे ऐसा उलझा जिया’ (६.७ कोटी आणि ९.६५ कोटी) आणि ‘कबीर सिंह’पेक्षा (२०.२१ कोटी आणि २२.७१ कोटी) खूप कमी आहे. एवढंच नव्हे तर ‘बत्ती गुल मीटर चालू’ (६.७६ कोटी, ७,९६ कोटी) चित्रपटापेक्षाही ‘देवा’ची दोन दिवसांची कमाई कमी आहे. शाहिदचा ‘बत्ती गुल मीटर चालू’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता.
दरम्यान, शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाच दिग्दर्शन लोकप्रिय मल्याळम दिग्दर्शक रोशन एंड्रयूज यांनी केलं आहे. या चित्रपटात शाहिद पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. ‘देवा’ चित्रपटात शाहिद आणि पूजा हेगडे व्यतिरिक्त कुबरा सैत आणि पवेल गुलाटीसह बरेच कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.