‘इश्क विश्क’ या चित्रपटातून २००३ साली बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता म्हणजे शाहिद कपूर (Shahid Kapoor) होय. शाहिद कपूरने ‘विवाह’, ‘जब वी मेट’, ‘फटा पोस्टर निकला हिरो’, ‘रंगून’, ‘कबीर सिंग’ अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे. त्याच्या अभिनयाबरोबरच अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळेदेखील मोठ्या चर्चेत राहिला. मात्र, शाहिद कपूर त्याच्या खासगी आयुष्यावर बोलणे टाळतो. आता मात्र एका मुलाखतीत अभिनेत्याने प्रेमभंग झाल्यानंतर तो सेटवर रडायचा असे वक्तव्य केले आहे. त्याच्या या वक्तव्याची चर्चा होताना दिसत आहे.
काय म्हणाला अभिनेता?
शाहिद कपूरने नुकतीच फेय डिसूझाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारण्यात आले की, त्याच्या करिअरमुळे तो कधी खोलीत एकटाच बसून रडला आहे का? यावर बोलताना त्याने म्हटले, “माझा प्रेमभंग झाला होता, त्यावेळी मी खोलीत बसून एकटाच रडत असे. कधीकधी तुम्ही चित्रपट बनवत असता तेव्हादेखील असे घडते, त्यामुळे मी रडलो आहे; तो काळ वाईट होता. माझे मेकअप आर्टिस्ट म्हणत असायचे की, मी आताच मेकअप केला आहे, तू रडणे थांबवू शकत नाहीस का? आणि मी त्यांना म्हणत असायचो की मी काही करू शकत नाही. मला वाटते की मी स्वत:ला उद्ध्वस्त करून घेत आहे. मी माझ्या प्रेमभंगामुळे रडलो आहे, कामामुळे कधीच नाही”, असे शाहिद कपूरने म्हटले आहे.
शाहिद कपूरने पुढे बोलताना पुरुषांनी आयुष्यात एक गोष्ट बदलायला हवी यावर भर देत म्हटले, “विशेषत: भारतीय पुरुषांनी काही गोष्टी बदलायला हव्यात. खूप लहान वयातच त्यांना हे सांगितले जाते की तुम्हाला इतरांना गोष्टी द्यायच्या आहेत, तुम्हाला संरक्षण करायचे आणि घरचा कर्ता पुरुष व्हायचे आहे. ज्या गोष्टी आवडतात, त्याचे संरक्षण करण्यासाठी पुरुष नेहमीच काळजीत असतात. कधी कधी यामुळे त्यांच्यावर मोठा दबाव निर्माण होतो. काही वेळा फक्त त्यांना आराम करायचा असतो आणि वाटत असते की, मला प्रत्येक गोष्टीची व माणसांची प्रत्येक वेळी काळजी करायची नाही. मलाही कधीतरी असुरक्षितता वाटू शकते आणि त्यावेळी इतर कोणीतरी माझे संरक्षण केले पाहिजे.”
“आपण आपल्या भूमिका, जबाबदाऱ्या का बदलत नाही? असुरक्षिततेसारखी भावना जाणवणे चुकीचे नाही, कारण शेवटी आपण सगळे माणसं आहोत. आपल्याला सगळ्या प्रकारच्या भावना जाणवू शकतात. अनेक पुरुषांना त्यांच्या कमकुवत बाजू उघड करणे अवघड वाटते. मला वाटते, मी कलाकार असल्याने माझ्यासाठी ते सहाजिक आहे. असुरक्षितता, कमकुवतपणा ही आकर्षित करणारी गोष्ट आहे, हे तुम्हाला कलाकार असल्याने समजते. ज्याप्रमाणे असुरक्षितता, कमकुवतपणा लोकांना आकर्षिक करते, ते राग करू शकत नाही. मनुष्याला असुरक्षित वाटू शकते, त्यामुळे पुरुष म्हणून तसे वाटणे हे सहाजिक आहे”, असे म्हणत पुरुषांनी कोणत्या गोष्टी बदलल्या पाहिजेत यावर शाहिद कपूरने वक्तव्य केले आहे.
शाहिद कपूरच्या कामाबाबतीत बोलायचे तर तो लवकरच ‘देवा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १४ फेब्रुवारी २०२५ ला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच आणखी एका चित्रपटात तो तृप्ती डिमरीबरोबर दिसणार आहे.