बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने ‘कबीर सिंग’ या चित्रपटातून जबरदस्त कमबॅक केला. या चित्रपटानंतर शाहिदच्या फिल्मी करियरला एक वेगळंच वळण मिळालं. आता तो ओटीटी विश्वातही नशीब आजमावून बघत आहे. नुकतीच त्याची प्राइम व्हिडीओवरील ‘फर्जी’ ही वेबसीरिज चांगलीच गाजली, त्यानंतर आलेला ‘ब्लडी डॅडी’ या चित्रपटालाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.
आता शाहिद कपूर नेमक्या कोणत्या चित्रपटात झळकणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. मध्यंतरी ‘जब वी मेट २’बद्दल प्रचंड चर्चा सुरू होती, पण दिग्दर्शकाने या चर्चेला पूर्णविराम दिला. मीडिया रीपोर्टनुसार शाहिद कपूर वाशु भगनानी आणि जॅकी भगनानी यांच्याबरोबर एका पौराणिक महाकाव्यावर आधारित चित्रपटात झळकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा : शाहरुखशी सतत होणाऱ्या तुलनेबद्दल अखेर शाहिद कपूरने सोडलं मौन; म्हणाला, “हे मूर्खपणाचं…”
असं म्हटलं जात आहे की शाहिदने महाभारतावर बेतलेल्या चित्रपटासाठी होकार दिला आहे. या चित्रपटात शाहिद महाभारतातील सर्वात महत्त्वाचं पात्र कुंती पुत्र कर्णाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा वाशु भगनानी यांच्या पूजा एंटरटेनमेंटने २०२१ मध्ये केल्याचं स्पष्ट झालं आहे. तेव्हापासूनच या चित्रपटावर काम सुरू होतं.
शाहिद कपूर या चित्रपटाचं चित्रीकरण २०२४ पासून सुरू करणार अशी चर्चा आहे. याबरोबरच निर्माते हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम व कन्नड या भाषांमध्ये सादर करायच्या विचारात आहेत. अद्याप शाहिदकडून या गोष्टीची पुष्टी झालेली नाही. सध्या शाहिदच्या हातात क्रीती सेनॉनबरोबरचा एक रोमॅंटिक ड्रामा चित्रपट आहे ज्याचं नाव अद्याप ठरलेलं नाही. याबरोबरच शाहिद एका कॉमेडी चित्रपटातही रश्मिका मंदानाबरोबर झळकणार आहे.