शार्क टँक इंडिया कार्यक्रमाला तरुणवर्गाकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. या कार्यक्रमातील परीक्षक तसेच ‘शादी डॉट कॉम’चे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे अनुपम मित्तल यांनी बॉलीवूड चित्रपटांबाबत आपले परखड मत व्यक्त केले आहे. सलमान खानचा ‘तेरे नाम’ असो वा शाहरुखचा ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ किंवा ‘डर’ असो या चित्रपटांना नेमका काय संदेश द्यायचा होता यामागील संकल्पना समजली नाही, असे विधान अनुपम मित्तल यांनी केले आहे.
शार्क टँक इंडिया फेम अनुपम मित्तल म्हणाले, “‘तेरे नाम’ चित्रपटात एक मुलगा मुलीच्या प्रेमासाठी वेडा होतो असे दाखवण्यात आल्याने यामार्फत समाजाला क्रूरतेशिवाय कोणताच संदेश मिळाला नाही. बॉलीवूडमध्ये लग्नपरंपरेला एक कार्यक्रम म्हणून दाखवले जाते, यामुळे लग्नाचे खरे मूल्य कळत नाही.”
हेही वाचा : “लोकांना ठरवू द्या…” ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी!
अनुपम मित्तल हे अनुपमा चोप्रासह एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाले होते. तेथे अनुपम यांना बॉलीवूड चित्रपटनिर्मिती आणि रोमँटिक चित्रपटांच्या संकल्पनेबद्दल आपले विचार मांडण्यास सांगितले होते. यावर ते म्हणाले, “आपण खूप भोळे लोक आहोत, चित्रपटात जे दाखवले जाते त्यावर आपला विश्वास बसतो. सलमानचा एक चित्रपट होता (तेरे नाम) ज्यात तो मुलीसाठी वेडा होतो, तर शाहरुखने क…क किरणचा डायलॉगचा (डर) चित्रपट केला. हे दोन्ही चित्रपट समाजाला योग्य संदेश देत नाहीत. नायक स्वतःला मारतोय, इजा करतोय, इकडे तिकडे उड्या मारतोय, असे यामध्ये दाखवण्यात आले आहे. हे एक नकारात्मक वर्तन असून असे चित्रपट पाहून आपण या सगळ्या गोष्टी शिकतो. मी लहानपणापासून बच्चनसाहेबांचे चित्रपट बघत मोठा झालो. हे सांगायला नको, पण जेव्हा कादर खान आणि शक्ती कपूर जोडी पडद्यावर येऊ लागली तेव्हापासून मी बॉलीवूड चित्रपट पाहणे बंद केले आणि हॉलीवूडकडे वळलो. परंतु, आता बॉलीवूडमध्ये वास्तववादी चित्रपट बनत आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा : ‘दंगल’फेम अभिनेत्रीचा मुंबईतील आलिशान फ्लॅटमध्ये गृहप्रवेश!
अनुपम पुढे म्हणाले, ‘जेव्हा २००० च्या दशकात राम गोपाल वर्माचे चित्रपट येऊ लागले, तेव्हा माझा बॉलीवूडमधील रस पुन्हा वाढला. रामूने काही उत्तम चित्रपट बनवले. त्याच्या ‘आग’ या चित्रपटाला मी सुद्धा स्पॉन्सर केले होते. राम गोपाल वर्माचा ‘आग’ हा शोलेचा रिमेक होता, या चित्रपटात अजय देवगण, सुष्मिता सेन आणि मोहनलाल यांनी भूमिका केल्या होत्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वर्षांनी अमिताभ बच्चन म्हणाले की, हा चित्रपट करणे ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती.
हेही वाचा : ‘मैं अटल हूं’ पंकज त्रिपाठींनी साकारला हुबेहूब लुक! व्हिडीओ शेअर करत सांगितले अटलजींचे विचार
दरम्यान, अनुपम मित्तल हे ‘शादी डॉट कॉम’चे संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांनी १९९७ मध्ये ही वेबसाइट सुरू केली असून मित्तल यांची एकूण संपत्ती १८५ कोटींच्या घरात आहे. त्यांनी अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. शार्क टँक इंडियामधील एक परीक्षक म्हणून त्यांची देशभरात ओळख निर्माण झाली आहे.