अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या जामनगरमधील प्री-वेडिंग सोहळ्यात अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सलमान खान, आमिर खान व शाहरुख खान या तिन्ही खाननी एकत्र येत प्री-वेडिंगमध्ये जबरदस्त डान्स केला. त्यांनी ‘आरआरआर’ चित्रपटातील पुरस्कारविजेत्या ‘नाटू नाटू’ गाण्यावर परफॉर्म केलं होतं. या परफॉर्मन्सनंतर शाहरुख खानने राम चरणचा अपमान केल्याचं म्हटलं जात आहे.
राम चरण व त्याची पत्नी उपासना कोनिडेला हे जोडपं अनंत व राधिकाच्या प्री-वेडिंगला उपस्थित राहिलं. सलमान खान, आमिर खान व शाहरुख खान यांनी ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स केला होता. डान्सदरम्यान शाहरुखने राम चरणला मंचावर बोलावलं आणि त्या चौघांनी एकत्र या गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. याचवेळी शाहरुखने राम चरणचा अपमान केल्याचा आरोप त्याची पत्नी उपासनाच्या मेकअप आर्टिस्टने केला आहे.
उपासनाच्या मेकअप आर्टिस्टचा दावा
मेकअप आर्टिस्ट झेबा हसनने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ शेअर करत शाहरुख खानने राम चरणचा अपमान केल्याचा आरोप केला. त्यानंतर वाद निर्माण झाला. तिने शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आणि मग राम चरणच्या चाहत्यांनीही नाराजी व्यक्त केली. “भेंड, इडली वडा राम चरण, तू कुठे आहेस? यानंतर मी बाहेर निघून गेले. राम चरण सारख्या स्टारला अशी अपमानास्पद वागणूक?” असं झेबाने स्टोरीला लिहिलं होतं. मात्र, नंतर तिने इन्स्टावरुन ही पोस्ट डिलीट केली.
![zeba hassan srk post](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/03/zeba-hassan-srk-post.jpeg?w=494)
राम चरणच्या चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी
दरम्यान, झेबाच्या या पोस्टनंतर राम चरणच्या चाहत्यांनी शाहरुखच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. “शाहरुख खानने दक्षिण भारतीय राम चरणला इडली म्हणत वर्णद्वेषी टिप्पणी केली आहे. त्याचे तथाकथित सुशिक्षित आणि मॉडर्न चाहते या गोष्टीचा निषेध करतील का?” असं एकाने एक्सवर म्हटलं आहे.
मुंबईतील मेकअप आर्टिस्टबद्दल पोस्ट
याशिवाय तिने आणखी एक पोस्ट केली आणि मुंबईतील मेकअप आर्टिस्टमुळे बाकीच्या शहरातील नवोदित मेकअप आर्टिस्टना काम मिळत नसल्याचा दावा केला. तिची ही पोस्टही व्हायरल होत आहे.
![Zeba hassan](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/03/Zeba-hassan.jpeg?w=316)
दरम्यान, जामनगरमधील हा प्री-वेडिंग सोहळा खूप चर्चेत राहिला, फक्त भारतातच नाही तर जगभरात याची चर्चा झाली. जगभरातील अनेक प्रतिष्ठित पाहुणे या सोहळ्याला हजर राहिले. या भव्य प्री-वेडिंगनंतर राधिका व अनंत जुलै महिन्यात मुंबईत लग्नबंधनात अडकणार आहेत.