चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि त्यांच्या चाहत्यांचे अनेक किस्से आपल्याला ऐकायला मिळतात. आपल्या आवडत्या कलाकाराला एकदा भेटता यावं, यासाठी ते अनेकदा जीवही धोक्यात घालतात. बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचे जगभरात चाहते आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याचे दोन चाहते मध्यरात्री ‘मन्नत’ बंगल्यातही घुसले होते. अशाच एका चाहत्याचा किस्सा शाहरुखने एका मुलाखतीत सांगितला होता.
शाहरुखने त्याच्या या अनोख्या चाहत्याबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं. एक व्यक्ती शाहरुखचा इतका मोठा चाहता होता की सुरक्षारक्षकाची नजर चुकवून तो ‘मन्नत’मध्ये शिरला होता. पण घरात गेल्यावर तो शाहरुखला भेटला नाही, तर तो स्विमिंग पूलजवळ गेला आणि त्याचे कपडे काढून थेट स्विमिंग पूलमध्ये उतरला. या चाहत्याबद्दल कळाल्यानंतर शाहरुख त्याला भेटायला आला. तेव्हाही त्या चाहत्याने शाहरुखबरोबर सेल्फी घेतला नाही किंवा त्याचा ऑटोग्राफही मागितला नाही. “मला काहीच नको. मला फक्त या स्विमिंग पूलमध्ये अंघोळ करायची आहे, ज्या पूलमध्ये शाहरुख अंघोळ करतो,” असं तो म्हणाला होता.
दरम्यान, शाहरुखच्या या चाहत्याचा किस्सा खूपच व्हायरल झाला होता. शाहरुख खानच्या चित्रटांबद्दल बोलायचं झाल्यास त्याचे ‘डंकी’ व ‘जवान’ हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाने जगभरात दमदार कमाई केली होती. या चित्रपटाने ११०० कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय केला होता. आता चाहते त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.