शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाचा वाद आणखीनच पेटला आहे. चित्रपटामधील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्याने बराच वाद सुरू आहे. सोशल मीडियावरूनही या चित्रपटाला विरोध दर्शवण्यात येत आहे. काही राजकीय मंडळींनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आता या वादामध्ये अभिनेते मुकेश खन्ना यांनी उडी घेतली आहे.
शर्लिन चोप्रा, पायल रोहतगी सारख्या कलाकारांनी दीपिकाच्या भगव्या बिकिनी वादावर प्रतिक्रिया दिली. आता मुकेश खन्ना यांनी याबाबत आपलं मत मांडलं आहे. ‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी दीपिका-शाहरुखच्या या गाण्याचा विरोध दर्शवला आहे.
मुकेश खन्ना म्हणाले, “आजच्या पिढीतील मुलं टीव्ही व चित्रपट पाहून मोठी होत आहेत. सेन्सॉर बोर्डाने अशाप्रकारच्या गाण्यांना मान्यता देऊ नये. सेन्सॉर बोर्ड काही सर्वोच्च न्यायालय नाही. ज्याला आपण विरोध करू शकत नाही. आपला देश काही स्पेन नाही जिथे अशाप्रकारची गाणी प्रदर्शित होतील. आता अर्धे कपडे परिधान करुन गाणी प्रदर्शित केली जात आहेत. काही काळानंतर कपडे परिधान न करताच गाणी तयार करण्यात येतील.”
“भगवा रंग एका धर्मासाठी किती महत्त्वाचा आहे हे गाणं बनवणाऱ्याला माहित नाही का? ज्याला आपण भगवा रंग म्हणतो तो शिवसेना पक्षाचा झेंडाही आहे. आपल्या आरएसएसमध्येही या रंगाचा सामावेश आहे. अमेरिकामध्ये त्यांच्या देशाच्या झेंड्याची बिकिनी तुम्ही परिधान करू शकता. पण भारतात अशाप्रकारचे कपडे परिधान करण्यास मान्यता नाही.” मुकेश खन्ना यांनी ‘बेशरम रंग’ गाण्याचा अश्लिल म्हणत विरोध दर्शवला आहे.