शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटाने काही सुपरहिट चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. २५ जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होताच किंग खानच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अजूनही शाहरुखचा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर गर्दी करत आहेत. चित्रपटाने प्रदर्शनाच्या सातव्या दिवशीही कोटी रुपयांची कमाई केली आहे.
३० जानेवारीला (सोमवारी) ‘पठाण’ने भारतात २६ कोटी ५ लाख रुपये कमाई केली. तर १ फेब्रुवारीला (मंगळवार) चित्रपटाने २१ कोटी रुपयांचा गल्ला जमावला. चित्रपटाने प्रदर्शनाच्या सातव्या दिवशी देशभरात ३२८ कोटी २५ लाख रुपये कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट ४०० कोटी रुपयांचा टप्पा पार करेल असं बोललं जात आहे.
‘पठाण’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ५७ कोटी रुपये कमाई केली होती. अगदी कमी दिवसांमध्येच ३०० कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या चित्रपटामध्ये ‘पठाण’चाही समावेश झाला आहे. कोणतंही प्रमोशन न करता या चित्रपटाला मिळत असलेलं यश खरंच कौतुकास्पद आहे. शिवाय शाहरुख, दीपिका व जॉन अब्राहमच्या भूमिकेचंही प्रेक्षक कौतुक करत आहेत.
हा चित्रपटाची कमाई आणि प्रेक्षकांचा चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता शाहरुख व दीपिकासाठी हे मोठं यश आहे. ‘दंगल’, ‘बाहुबली २’, ‘केजीएफ २’ सारख्या चित्रपटांप्रमाणेच ‘पठाण’ही कमाई करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी ‘पठाण’चा दुसरा भागही येणार असल्याची घोषणा केली आहे.