शाहरुख खान गेले अनेक महिने मोठ्या पडद्यापासून लांब आहे. त्याचा शेवटचा चित्रपट ‘झिरो’ २०१८ साली प्रदर्शित झाला होता. परंतु हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात फ्लॉप चित्रपट ठरला. तो नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करत असतो. त्यामुळेच १० वर्षांपूर्वी त्याने ‘रा.वन’ सारखा चित्रपट केला. या चित्रपटाने फारशी कमाई केली नसली तरीही त्याचे व्हीएफएक्स आणि स्पेशल इफेक्ट्स त्यावेळी बॉलिवूडसाठी नवीन होते. परंतु हल्ली सर्रास वापरल्या जाणाऱ्या व्हीएफएक्सवर मोठ्या प्रमाणात टिका होताना दिसते. याबद्दल शाहरुखने १०-१२ वर्षांपूर्वी एक भाकित केले होते, जे आज खरे होत आहे.
आणखी वाचा : दीपिका पदुकोणने सांगितले हॉलिवूडमध्ये काम न करण्याचे कारण, नेटकरी म्हणाले, “हिचे रडगाणे…”
२०११ मध्ये प्रीती झिंटाबरोबर दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुखने बॉलीवूडमध्ये एक वाईट टप्पा येईल आणि लोकांमधील हिंदी चित्रपट बघण्याचे रस कमी होईल, असे भाकित केले होते. तेव्हा शाहरुख म्हणाला होता, “इंडस्ट्रीने मला खूप काही दिले आहे. माझ्या करिअरच्या शेवटी मला खलनायक साकारणे, नायिकांबरोबर रोमान्स करणे आणि नृत्य करणे या व्यतिरिक्त एक वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर पडायची आहे. मी हे सर्व माझ्यासाठी केले आहे पण हिंदी चित्रपटातील व्हीएफएक्ससाठी प्रेक्षकांनी मला आठवावे असे मला वाटते.
पुढे त्याने सांगितले, “हिंदी चित्रपटसृष्टीची प्रगती झाली नाही तर लोकांचा कलही त्यापासून दूर जाईल. आपण लार्जर दॅन लाईफ चित्रपटांकडे वाटचाल केली पाहिजे. आपण असे केले नाही तर येणारी तरुण पिढी आपले चित्रपट पाहणे बंद करेल. ते आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहण्यास सुरुवात करतील. त्यांना आपले भारतीय सुपरहिरो बघायला मिळाले पाहिजेत. आपल्या पौराणिक कथांमध्ये सांगण्यासाठी खूप छान कथा आहेत. हे सगळं आपण नव्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे.”
शाहरुख खानने या सर्व गोष्टी सांगितल्या तेव्हा कोणतेही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नव्हते. आज बिग बजेट चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हीएफएक्स वापरले जात आहेत. हे सगळे चित्रपट भारतीय पौराणिक कथांवर आधारित आहेत. याशिवाय प्रेक्षक आता ‘पुष्पा’, ‘आरआरआर’ आणि ‘केजीएफ’ सारख्या चित्रपटांमधील लार्जर दॅन लाइफ व्यक्तीरेखांना पसंती दर्शवत आहेत. त्यामुळे शाहरुखने १०-१२ वर्षांपूर्वी केलेले भाकित आज खरे ठरत आहे.
हेही वाचा : शाहरुखच्या ‘डॉन ३’मध्ये होणार ‘या’ अभिनेत्याची एंट्री, पाहिल्यांदाच शेअर करणार किंग खानबरोबर स्क्रीन
दरम्यान शाहरुखच्या आगामी चित्रपटांच्या यादीत ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांचा समावेश आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. शाहरुखबरोबर या चित्रपटात जॉन अब्राहम, दीपिका पदूकोण हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत बघायला मिळणार आहेत. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात ‘पठाण’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तर त्याचा ‘जवान’ हा चित्रपट जून २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.