बुधवारीच पाकिस्तानी क्रिकेटपटू भारतात २०२३ चा वर्ल्डकप खेळण्यासाठी आले आहेत. पाकिस्तानी संघ तब्बल ७ वर्षांनी भारतात क्रिकेट खेळण्यासाठी आल्याने यावर बरीच मतमतांतरे पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे तर काही सेलिब्रिटीजनीसुद्धा यावर भाष्य केलं आहे. शाहरुख खानचा ‘रईस’ हा चित्रपट दिग्दर्शित करणारे राहुल ढोलकीया यांनीही यावर भाष्य केलं आहे.
क्रिकेटर्सना परवानगी दिल्यानंतर आता पाकिस्तानी कलाकारांनाही भारतात यायची परवानगी मिळावी अशी त्यांनी आशा व्यक्त केली आहे. उरी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी कलाकार व खेळाडू यांच्यावर बंदी घातल्यामुळे हा विषय काही वर्षांपूर्वी चांगलाच चिघळला होता. निर्माता दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटालाही याचा चांगलाच फटका बसला होता.
आता पुन्हा पाकिस्तानी क्रिकेटर्सची भारतीय मैदानावर वापसी झालेली पाहून राहुल ढोलकीया यांनी ट्वीट करत लिहिलं, “आता पाकिस्तानी क्रिकेटर्ससुद्धा इथे आले आहेत, तर आपण पाकिस्तानी कलाकार, गायक यांनाही पुन्हा भारतात निमंत्रण देऊ शकतो का?” राहुल ढोलकीया यांनी २०१७ साली प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘रईस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
त्यावेळी ‘रईस’मध्ये शाहरुख खानसह पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत होती. पण त्यावेळी पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी असल्याने या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी माहिराला भारतात येणं शक्य झालं नव्हतं अन् यावरही त्यावेळी राहुल ढोलकीया यांनी भाष्य केलं होतं.