शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना यातील शाहरुख खानचे वेगवेगळे लूक्स पसंत पडले आहेत. आता या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने चांगली कमाई करायला सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या शुक्रवारपासून ‘जवान’चं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. शाहरुख खाननेही याबद्दल सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. शाहरुखचे चाहते अन् सिनेप्रेमी या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. याबरोबरच शाहरुख खानचे वेगवेगळे फॅनक्लबसुद्धा या चित्रपटाचे वेगवेगळे शोज आयोजित करत आहेत. ‘बुक माय शो’च्या रीपोर्टनुसार देशभरात जवानची ७५ लाख तिकिटे विकली गेली आहेत.

आणखी वाचा : “जेव्हा चित्रपट येईल…” ‘डॉन ३’मध्ये रणवीर सिंगच्या निवडीमुळे होणाऱ्या टिकेला रितेश सिदवानीने दिलं उत्तर

उत्तर भारतात ‘जवान’ला ५००० स्क्रिन्स मिळाल्या आहेत तर संपूर्ण देशभरात तब्बल ५५०० स्क्रिन्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. इतकंच नव्हे तर काही बंद पडलेली सिंगल स्क्रीन थिएटरसुद्धा यानिमित्ताने पुन्हा सुरू होताना दिसत आहेत. एकूणच हे चित्र पाहता शाहरुख खानचा ‘जवान’ पहिल्याच दिवशी भारतात ६० ते ७० कोटींची कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं घडल्यास हा रेकॉर्ड करणारा ‘जवान’ हा पहिला चित्रपट ठरू शकतो.

चित्रपट समीक्षक आणि ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनीही हिंदी चित्रपटांबद्दल सकारात्मक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “सध्याची एकूणच परिस्थिती ही हिंदी चित्रपटांसाठी सकारात्मकच आहे. ज्यांना वाटत होतं आता हिंदी सिनेमा संपला त्यांच्यासाठी हे खणखणीत उत्तर आहे. लोक चित्रपटगृहात बॉलिवूडचे चित्रपट पाहायला गर्दी करत आहेत. हा सध्या हिंदी चित्रपटांसाठी सुवर्णकाळ आहे.”

अॅटलीने ‘जवान’चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा, दीपिका पदुकोण आणि सुनील ग्रोव्हर हे कलाकार दिसणार आहेत. ‘जवान’ ७ सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan jawan will set new benchmark will earn 70 crore on first day avn
Show comments