बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा गेले काही दिवस सातत्याने चर्चेत आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली. त्यानंतर आजवर जगभरात या चित्रपटाने ६०० कोटीहून अधिक कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने इतिहास रचला आहे.
शाहरुखच्या ‘पठाण’बरोबरच ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपटही सध्या पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे, आणि हा चित्रपटही पुन्हा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करायचा निर्णय घेण्यात आला. १० फेब्रुवारीला या चित्रपटाने २.२ लाखांची कमाई केली. दुसऱ्याच दिवशी या बॉक्स ऑफिसवर याची कामाई पाचपटीने वाढली, आणि १२ फेब्रुवारीलासुद्धा या चित्रपटाने तेवढीच कमाई केली आहे.
‘बॉलिवूड हंगामा’च्या रीपोर्टनुसार आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘डीडीएलजे’ या चित्रपटाने २२ लाखांची कमाई केली आहे. हंसल मेहता यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘फराज’च्या संपूर्ण कमाईपेक्षा जास्त कमाई करत डीडीएजजेने वेगळाच इतिहास रचला आहे. इतकंच नाही तर १४ फेब्रुवारीला हे आकडे आणखी वाढतील अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
१९९५ साली प्रदर्शित झालेल्या शाहरुख खान आणि काजोलच्या लव्हस्टोरीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या चित्रपटानंतर शाहरुख आणि काजोलच्या करीअरला एक वेगळंच वळण मिळालं. टे तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले. आजही मुंबईच्या मराठा मंदिर या चित्रपटगृहात हा चित्रपट सुरू आहे. लवकरच हा चित्रपट तिथे १०००० दिवस पूर्ण करणार आहे.