बॉलीवूडचा किंग खान म्हणून ज्याची सर्वदूर ओळख आहे, तो अभिनेता म्हणजे शाहरुख खान हा होय. शाहरुख सतत विविध कारणांमुळे चर्चेत असतो. कधी चित्रपटांतील भूमिकेमुळे तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे तो चर्चांचा भाग बनलेला दिसतो. याबरोबरच, अनेकदा शाहरुख खासगी जीवनात ज्या पद्धतीने लोकांशी वागतो, त्यांच्याबरोबर बोलतो, त्याचीदेखील चर्चा होताना दिसते. अनेकदा त्याचे सहकलाकार, परिचित त्याच्या प्रेमळ स्वभावाबद्दल बोलताना दिसतात. आता ज्येष्ठ पत्रकार रोश्मिला भट्टाचार्य यांनी शाहरुखबद्दल एक किस्सा सांगितल्याने पुन्हा एकदा अभिनेत्याची चर्चा होताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्येष्ठ पत्रकार रोश्मिला भट्टाचार्य यांनी ‘इनकॉन्हवर्सेशन विथ इशान’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी ९० च्या दशकात शाहरुख खानची मुलाखत घेण्यासाठी गेल्यावर शाहरुख खानने त्याची गाडी त्यांना घरी सोडण्यासाठी पाठवल्याची आठवण सांगितली आहे. त्या म्हणतात,” ९० च्या दशकात मी शाहरुख खानची मुलाखत घेण्यासाठी फिल्मसिटी मध्ये गेले होते. त्याचे तिथे शूटिंग सुरु असल्याने मधल्या ब्रेकमध्ये तो मुलाखतीसाठी यायचा. त्यामुळे मला तिथे खूप वेळ झाला.

मी त्यावेळी वाशीमध्ये राहायचे आणि त्या काळात वाशीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन नव्हत्या. वाशीला जाण्यासाठी टॅक्सीदेखील मिळत नसत. फक्त बसने प्रवास शक्य व्हायचा. या सगळ्यात शेवटची बस जी ११.३० ला होती, ती निघून गेली. त्यावेळी मोबाईल फोन नव्हते, माझे पती घरी माझी वाट बघत होते. मी सतत घड्याळाकडे बघत होते. शाहरुख ब्रेकमध्ये आला आणि म्हणाला की, मुलाखत पूर्ण करूयात. मी त्यावेळी फक्त २४-२५ वर्षाची होती आणि माझ्या डोळ्यात अश्रू होते. शाहरुखने मला विचारले, काय झालं? मी त्याला सांगितलं की, घरी जाण्यासाठी शेवटची बस होती, ती निघून गेली. आता पूर्ण रात्र मी कुठे काढणार, हे मला माहित नाही.

हेही वाचा: “हे लोक घरातले गुंड…”, प्रसिद्ध निर्मात्यांनी जान्हवीसह वैभव-अरबाजला सुनावलं; म्हणाले, “अतिशय वाईट…”

शाहरुख खानने तिला विचारले की, मल हे अगोदरच का सांगितलं नाही. पुढे तो म्हणाला कि, काळजी करु नकोस. मी माझी गाडी पाठवतो. मी त्याला विचारलं, वाशीला? तिकडे पोहण्यासाठी खूप वेळ लागेल. तो म्हणाला, हो. मी इकडे शूटिंग करत आहे. तुला ड्रायव्हार घरी सोडून येईल. फक्त जेव्हा तू घरी पोहचशील तेव्हा ड्रायव्हरला मला फोन करायला सांग. त्याला परत फिल्म सिटीला यायचे आहे की घरी जायला सांगायचे, हे मी त्याला कळवू शकेन.

पुढे रोश्मिला भट्टाचार्य म्हणतात की, त्यानंतर पुढे मी त्याला असं विचारलं की, मग तू घरी कसा जाणार? त्यावर शाहरुखने काळजी करू नकोस. मला कोणीतरी घरी सोडेल. असे म्हटले होते. त्याची गाडी मला वाशीपर्यंत सोडायला आली होती. अशी आठवण रोश्मिला भट्टाचार्य यांनी सांगितली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan made sure his car dropeed me at vashi when i miss my last bus i was teary eyed nsp