मुंबई पाहायला येणारा प्रत्येक माणूस शाहरुख खानच्या ‘मन्नत’ निवासस्थानी आवर्जून भेट देतो. वांद्रे येथील बॅण्डस्टँडपासून अगदी हाकेच्या अंतरावर शाहरुखचा ‘मन्नत’ बंगला स्थित आहे. अभिनेत्याच्या वाढदिवशी त्याचे लाखो चाहते त्याच्या घराबाहेर गर्दी करतात. शाहरुखचा वाढदिवस आणि मन्नत याचं एक वेगळं समीकरण गेल्या काही वर्षात तयार झालेलं आहे. अभिनेता व त्याचे कुटुंबीय जवळपास २५ वर्षांपासून या घरात वास्तव्यास आहेत. मात्र, आता एका महत्त्वाच्या कारणासाठी शाहरुख पुढचे काही दिवस मन्नतपासून दूर राहणार आहे.
शाहरुख खान त्याचं ‘ड्रीम होम’ असलेला मन्नत बंगला सोडून पुढील काही महिने भाड्याच्या घरात राहणार आहे. ‘मन्नत’मध्ये नुतनीकरणाचं काम सुरू झालेलं आहे. यामुळे अभिनेता त्याच्या कुटुंबीयांसह भाड्याच्या घरात शिफ्ट झाला आहे. नुकतंच पापाराझींनी शाहरुख, सुहाना आणि त्यांची मॅनेजर पूजा ददलानी यांना त्याच्या भाड्याच्या घराबाहेर पाहिलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या कंपनीने प्रसिद्ध निर्माते वासु भगनानी यांचा मुलगा अभिनेता जॅकी भगनानी व त्यांची मुलगी दीपशिखा देशमुख यांच्याबरोबर करार केला आहे. खान कुटुंबीय वांद्रे पश्चिम येथील पूजा कासामध्ये शिफ्ट झाले आहेत. ही जागा जॅकी व दीपशिखा यांच्या मालकीची आहे. शाहरुख चार मजल्यांसाठी दरमहा २४ लाख रुपये भाडं भरणार आहे. शाहरुखने भगनानी कुटुंबाकडून फ्लॅट्स भाड्याने घेतले आहेत.
मन्नतच्या तुलनेत ही जागा खूपच लहान आहे. या अपार्टमेंटमध्ये शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाचे सुरक्षारक्षक आणि कर्मचारी देखील असतील. इंडियन एक्स्प्रेसला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही जागा मन्नत एवढी मोठी नाहीये मात्र, शाहरुखचे सुरक्षारक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी पुरेशी जागा आहे.
शाहरुख खानचे नवे शेजारी कोण असतील?
शाहरुखने भगनानी कुटुंबाकडून अपार्टमेंट भाड्याने घेतल्यामुळे, ते त्याचे शेजारीही असतील कारण, संपूर्ण इमारत त्यांच्या मालकीची आहे. जॅकी भगनानी, त्याची पत्नी अभिनेत्री रकुल प्रीत सिंग, वाशु भगनानी आणि पूजा भगनानी सुद्धा त्याच इमारतीत राहतात.
याशिवाय, दिलीप कुमार यांचा बंगला ‘पूजा कासा’पासून जवळच आहे. संजय दत्तचे घर आणि कपूर कुटुंबाचा प्रतिष्ठित बंगला देखील याच परिसरात आहे. त्यामुळे भाड्याच्या घरात राहताना हे सगळे शाहरुखचे नवे शेजारी असणार आहेत.