एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जीचे नाव आवर्जुन घेतले जाते. गेल्या काही वर्षात ती फार कमी चित्रपटात झळकली आहे. त्यातील अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केलेली नाही. मात्र आता राणी मुखर्जीची प्रमुख भूमिका असलेला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
प्रेक्षकांनी या चित्रपटाला मिश्र प्रतिसाद दिला आहे. ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’चा या चित्रपटाची कथा एक आई तिच्या मुलांसाठी देशाविरुद्ध त्यांच्या कायद्याविरुद्ध कशी लढते यावर आधारित आहे. फक्त सामान्य जनताच नव्हे तर कित्येक बॉलिवूड सेलिब्रिटीजनीसुद्धा राणीच्या या चित्रपटातील कामाचं कौतुक केलं आहे.
आणखी वाचा : क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांची भूमिका साकारणार होता शाहरुख खान, पण…
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यानेसुद्धा राणीच्या या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. ट्विटरवर पोस्ट करत शाहरुखने त्याचं मनोगत व्यक्त केलं आहे. शाहरुख म्हणतो, “मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे चित्रपटाच्या संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. माझी राणी या मुख्य भूमिकेत अगदी उठून दिसली आहे, दिग्दर्शिका अशिमा हिनेसुद्धा राणीच्या पात्राचा हा खडतर प्रवास उत्तमरित्या पडद्यावर मांडला आहे. सगळ्यांचीच कामं अप्रतिम आहेत, जरूर पहावा असा चित्रपट.”
नॉर्वे या देशातील कायद्याचा दाखला देत राणीच्या पात्राची दोन्ही मुलं तिच्यापासून दूर नेली जातात. ती एक चांगली आई नाही, ती मानसिक रुग्ण आहे, असा दावाही केला जातो. या घटनेमुळे मिसेस चॅटर्जीचं संपूर्ण आयुष्यचं बदलून जातं. यानंतर मिसेस चॅटर्जी तिची मुले परत मिळवण्यासाठी देशाविरुद्ध कशाप्रकारे कायदेशीर लढाई लढतात? या दरम्यान त्यांना काय काय भोगावे लागते? हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात राणी मुखर्जीबरोबर अनिर्बन भट्टाचार्य, जिम सरभ आणि नीना गुप्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिमा छिब्बर यांनी केले आहे.