तब्बल चार वर्षांपासून मोठ्या पडद्यावरून दूर असलेल्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित व्हायला अवघा एक महिना बाकी आहे. काही दिवसांपूर्वी ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम गाणं’ प्रदर्शित झालं, गाण्याचे बोल आणि दीपिका पदुकोणने परिधान केलेली भगवी बिकिनी यावरून चांगलाच वाद पेटल्याचं पाहायला मिळालं. हिंदू महासभेसह भाजपाने चित्रपट प्रदर्शित न होऊ देण्याचा इशारा दिला. याच गदारोळात या चित्रपटातलं दुसरं गाणं ‘झूमे जो पठाण’ प्रदर्शित झालं. पण या गाण्याला ‘बेशरम रंग’ इतका प्रतिसाद मिळाला नाही.

आतापर्यंत चित्रपटातील दोन गाणीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट बघत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होईल, याबद्दल अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अशातच एका चाहत्याने शाहरुखला ट्रेलरबद्दल विचारलं असता त्याने भन्नाट उत्तर दिलंय. ट्विटरवर AskSRK या सेशनअंतर्गत शाहरुखने काही चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यात एकाने ‘पठाणचा ट्रेलर का रिलीज करत नाही’, असा प्रश्न विचारला, त्यावर शाहरुखने “हाहा माझी मर्जी! ट्रेलर यायचा तेव्हा येईल”, असं उत्तर दिलं.

pathaan
चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखने दिलेलं उत्तर (फोटो – ट्विटर स्क्रीनशॉट)

आणखी वाचा – चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकूनसुद्धा किंग खान म्हणतो, “तुम्ही ‘पठाण’ पाहायला हवा, कारण…”

शाहरुखने अनेक चाहत्यांना उत्तरं दिली, नंतर त्याचा लहान मुलगा अबराम बोलवत असल्यानं आपल्याला जावं लागतंय, असं शाहरुख म्हणाला. जाण्यापूर्वी त्याने त्याच्या चाहत्यांना ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या. “आता जावं लागेल, लहान मुलगा कॉल करून बोलावत आहे. तुम्हा सर्वांचे आभार. तुम्हाला नवीन वर्षाच्या आणि मेरी ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा,” असं शाहरुख म्हणाला.

हेही वाचा – Jhoome Jo Pathaan : शाहरुखचा डॅशिंग लूक, दीपिकाच्या मोहक अदा; प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडणारं ‘पठाण’चं नवं गाणं प्रदर्शित

दरम्यान, शाहरुखचा पठाण चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चाहते खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. तब्बल चार वर्षांनी पठाणमधून शाहरुख मोठ्या पडद्यावर पुनरागम करणार आहे.

Story img Loader