बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख सध्य ‘जवान’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला. शाहरुख सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना शाहरुख नेहमी उत्तर देत असतो अलीकडेच अभिनेत्याने ‘आस्क एसआरके’ (#AskSRK)सेशन घेतले. या वेळी शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी काही प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांना शाहरुखने भन्नाट उत्तरे दिली आहेत.
अशाच एका चाहत्याने शाहरुखला ‘जवान’ चित्रपटाबाबत प्रश्न विचारला. किती तासांचा चित्रपट बनवलास? असा प्रश्न चाहत्याने विचारला होता. या प्रश्नाला शाहरुखने त्याच्या नेहमीच्या हटके स्टाईलमध्ये त्याला उत्तर दिलं. शाहरुख म्हणाला, ‘तुझ्याजवळ किती वेळ आहे? तितकाच सिनेमा बघ भाऊ. खूप बिझी असतोस वाटतं.’ शाहरुखच्या या उत्तराची सगळीकडे चर्चा सुरु आहे.
‘जवान’ चित्रपटाच्या ट्रेलरला फक्त २४ तासांमध्ये तब्बल ११२ मिलियन व्ह्यूज मिळाले होते. शाहरुखच्या ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ याबाबत एक ट्वीटही केले होते. यापूर्वी शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटाद्वारे शाहरुखने तब्बल ४ वर्षांनी बॉलीवूडमध्ये पुनरागमन केले होते. ‘पठाण’ चित्रपटापासूनच शाहरुखच्या ‘जवान’ची चर्चा सुरु झाली होती.
हेही वाचा- शाहरुखच्या ‘जवान’चा ट्रेलर पाहताच ‘या’ अभिनेत्यानं बुक केलं चित्रपटाचं पहिलं तिकिट
दरम्यान, ‘जवान’ चित्रपटात शाहरुखबरोबर नयनतारा आणि विजय सेतुपती यांचीही प्रमुख भूमिका आहे. तसेच दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, गिरिजा ओक, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोंगरा, सुनील ग्रोव्हर आणि मुकेश छाबरा हे कलाकार सुद्धा चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहे.