शाहरुख खान हा त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे या चित्रपटावरून वाद होताना दिसतोय तर दुसरीकडे शाहरुखचे चाहते त्याला चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी फार उत्सुक आहेत. पठाण या चित्रपटाकडे त्यांनी इतकं लक्ष केंद्रित केलं आहे की त्याने दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनाही शूटिंगसाठी थांबवून ठेवले आहे.
शाहरुख खानच्या आगामी चित्रपटांच्या यादीत ‘पठाण’बरोबरच ‘जवान’ आणि ‘डंकी’ हे दोन चित्रपटही सामील आहेत. ‘जवान’ हा चित्रपट २०२३ च्या मध्यात प्रदर्शित होणार आहे, तर त्याचा ‘डंकी’ हा चित्रपट २०२३ च्या शेवटी प्रदर्शित होईल. ‘डंकी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी करत आहेत. गेले अनेक महिने शाहरुखबरोबर ते या चित्रपटावर काम करत आहेत. पण आता शाहरुखने या चित्रपटाच्या कामातून थोडा ब्रेक घेतला आहे.
आणखी वाचा : “… तर आज ‘वेड’ माझ्याऐवजी ‘त्याने’ दिग्दर्शित केला असता,” रितेश देशमुखचा चित्रपटाबाबत मोठा खुलासा
‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, सौदी अरेबियामध्ये चित्रीकरण होणारा ‘डंकी’ हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाच्या टीमने या चित्रपटाच्या शूटिंगचं पहिलं शेड्युल सौदी अरेबियामध्ये काही दिवसांपूर्वी पूर्ण केलं. त्यानंतर आता या चित्रपटातील काही महत्त्वाचे अंडरवॉटर सीन्स शूट करायचे आहेत. परंतु शाहरुख खान सध्या ‘पठाण’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असल्यामुळे ‘डंकी’ या चित्रपटाचं उरलेलं शूटिंग तो ‘पठाण’च्या प्रदर्शनानंतर सुरू करणार आहे. त्याचप्रमाणे हे शूटिंग सुरू करण्यापूर्वी तो अंडरवॉटरचं ट्रेनिंगही घेणार आहे.
हा सीन चित्रपटात परदेशात घडत असलेला दाखवण्यात येणार असला तरीही या सीनचं चित्रीकरण मुंबईत शूटिंग सेटवर केलं जाणार आहे. त्यामुळे हे सीन्स शूट करण्यासाठी राजकुमार हिरानी यांना ‘पठाण’च्या प्रदर्शनापर्यंत थांबावं लागणार आहे. ‘डंकी’ या चित्रपटाचा शूटिंग मार्च २०२३ च्या अखेरीस पूर्ण होईल असंही समोर येत आहे. शाहरुख खानबरोबरच ‘डंकी’ या चित्रपटात विकी कौशल, तापसी पन्नू आणि बोमन इराणी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट २२ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होईल.