बॉलीवूडचे काही कलाकार असे आहेत, ज्यांना पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी होते. हे कलाकार चित्रपटात आहेत म्हणजे तो चित्रपट चांगला असणार, असा विश्वास प्रेक्षकांना असतो. अशा कलाकारांपैकीच एक म्हणजे शाहरुख खान (Shahrukh Khan) होय. एका काळ असा होता की, मला अभिनय करण्याची इच्छा उरली नव्हती, असा खुलासा एका मुलाखतीदरम्यान शाहरुख खानने केला आहे आणि त्यामुळे सध्या तो चर्चेचा भाग बनला आहे.
चित्रपटसृष्टीत किंग खान म्हणून ओळख असलेल्या या अभिनेत्याने एकापेक्षा एक चित्रपटांतून आणि वेगळ्या भूमिकांतून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. मात्र, शाहरुख खानचे असे काही काही चित्रपट आहेत; ज्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. त्यानंतर शाहरुख बराच काळ कोणत्याही चित्रपटात दिसला नव्हता.
काय म्हणाला शाहरुख खान?
आता एका मुलाखतीदरम्यान, शाहरुख खानने यावर खुलासा करताना म्हटले आहे, “२०१८ मध्ये ‘झिरो’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर जानेवारी २०१९ मध्ये मी एका चित्रपटाचे शूटिंग करणार होतो. पण, शूटिंग सुरू होण्याआधी अगदी शेवटच्या क्षणी निर्माता आणि दिग्दर्शकाला स्पष्टपणे सांगितले की, मी वर्षभर काम करणार नाही. हे खूप अव्यावसायिक होते. मात्र, मी हे कायम लक्षात ठेवतो की, ज्या दिवशी मला सकाळी उठल्यानंतर शूटसाठी जावेसे वाटत नाही, त्या दिवशी मला काम करावेसे वाटत नाही.”
शाहरुख पुढे म्हणतो, “मी निर्मात्याला फोन केला आणि त्याला सांगितले की, मला हे वर्षभर काम करायचे नाही. माझ्या या बोलण्यावर त्याला विश्वासच बसत नव्हता.” तो म्हणाला, “हे शक्यच नाही. तू एक मिनीटभरदेखील काम केल्याशिवाय बसू शकत नाहीस. हे शक्य नाही. तू नाही म्हणतो आहेस म्हणजे तुला चित्रपटाची कथा आवडली नाही. कृपया, हे नको सांगू की, तू वर्षभर काम करणार नाही.” “दीड वर्षानंतर मला त्याचा फोन आला आणि तो मला म्हणाला की, मला आश्चर्य वाटत आहे की, तू खरंच काम करत नाहीयेस,” अशी आठवण शाहरुख खानने सांगितली आहे.
पुढे बोलताना तो म्हणतो, “मला त्यावेळी काम करावंसं वाटत नव्हतं. मला अभिनय करावासा वाटत नव्हता. त्यामुळे मी त्या काळात कोणताही चित्रपट केला नाही. कारण- मला वाटते अभिनय ही नैसर्गिक बाब आहे.”
शाहरुख खानने हा ब्रेक घेण्यापूर्वी तो ‘झिरो’, ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘रईस’, ‘फॅन’ या चित्रपटांत तो दिसला होता. मात्र, या चित्रपटांना फारसे यश मिळू शकले नसले तरी हे सगळे चित्रपट त्याला आवडतात, असे त्याने सांगितले.
दरम्यान, २०२३ मध्ये ‘पठाण’, ‘जवान’ व ‘डंकी’ या चित्रपटांतून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले होते.