शाहरुख खानच्या जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जादूई कमाई केली. आता शाहरुख पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. किंग खानचा ‘जवान’ हा चित्रपट २ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून ‘जवान’ ७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची शाहरुखचे लाखो चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
शाहरुख खान नेहमी #AskSRK या ट्विटर सेशनमध्ये आपल्या चाहत्यांनी केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. ‘जवान’ चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकल्यानंतर शाहरुखने पुन्हा एकदा #AskSRK सेशन घेतले. यावेळी चाहत्यांनी शाहरुखला अनेक प्रश्न विचारले. यात सर्वाधिक विचारला गेलेला प्रश्न म्हणजे, ‘जवान’ची रिलीज डेट पुढे का ढकलली? यामागील कारण काय? यावर शाहरुखने आपल्या चाहत्यांना दिलखुलास उत्तरे दिली आहेत.
‘जवान’ २ जूनऐवजी ७ सप्टेंबरला का प्रदर्शित होणार? यावर शाहरुख म्हणतो, “प्रत्येकजण या चित्रपटासाठी अथक काम करत होता आणि जास्तीत जास्त मेहनत घेत होता. त्यामुळे तारीख पुढे ढकलली जेणेकरून सर्वजण अधिक सहजतेने काम करू शकतील.”
हेही वाचा : राव आणि रंभाची ऐतिहासिक प्रेमकथा रुपेरी पडद्यावर
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून शाहरुखला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ७ सप्टेंबर २०२२ रोजी ‘जवान’ प्रेक्षकांच्या भेटीला येईल यासंदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत शाहरुखने ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.