Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा तीन दिवसांचा प्री-वेडिंग सोहळा संपला आहे. पण अजूनही या प्री-वेडिंग सोहळ्याची चर्चा सुरुच आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहेत. अशातच अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात शाहरुख खानने पत्नी गौरी खानसह केलेल्या रोमँटिक डान्सचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या पहिल्या दिवशी जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाचा परफॉर्मन्स झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा झाला. यामध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. बॉलीवूडचे तीन खान ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स करताना दिसले. तर रणबीर कपूर-आलिया भट्ट आकाश अंबानी-श्लोका मेहतासह ‘केसरिया’ या गाण्यावर थिरकले. काल, तिसऱ्या दिवशी ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम झाला. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आउटडोअर कार्यक्रम होता. ज्याद्वारे पाहुण्यांना जामनगर, वनतारा फिरवलं. त्यानंतर रात्री भव्य महाआरती आणि अनंत-राधिका यांची हस्ताक्षर सेरेमनी पार पडली. याशिवाय अरिजीत सिंह, लकी अली, श्रेया घोषालसह बऱ्याच लोकप्रिय गायकांचा परफॉर्मन्स झाला. यावेळी शाहरुख खान पत्नी गौरी खानसह डान्स करताना पाहायला मिळाला.
शाहरुख खान व गौरी खानचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘मानव मंगलानी’ व किंग खानच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, शाहरुख गौरी खानसह ‘मैं यहां हूं यहां’ या गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. यावेळी शाहरुख पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये पाहायला मिळत आहे. तर गौरी खानने निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. दोघांचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय झाला आहे.
हेही वाचा – Video: रणबीर कपूर-आलिया भट्टचा लेकीसह जामनगरहून परतीचा प्रवास, राहाच्या क्यूट अंदाजने वेधलं लक्ष
दरम्यान, अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाला अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, करिना कपूर, सैफी अली खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, जान्हवी कपूर, सोनम कपूर, रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख, अर्जुन कपूर, सुहाना खान, नव्या नवेली नंदा, टायगर श्रॉफ, करिश्मा कपूर, राणी मुखर्जी, सोनाली बेंद्रे, नताशा पूनावालासह बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहिले होते.